मुंबई : वाचन आणि पर्यटन या दोन्ही बाबींची सांगड घालणाऱ्या सातारा जिल्ह्यातील भिलार येथील  ‘पुस्तकांचे गांव’ या सरकारच्या प्रकल्पाला शिथिलिकरणानंतर उभारी आली असून सध्या शेकडो वाचकांच्या आठवडी वाऱ्या या निसर्गरम्य ग्रंथग्रामात होत आहेत. करोनाकाळात वर्दळ नसलेला हा भाग आता गजबजला आहे.

 सप्टेंबरनंतर वाचकांचा प्रतिसाद वाढला असून सध्या दरदिवशी १५० हून अधिक आणि सुट्टय़ांच्या कालावधीत ४०० हून अधिक वाचक पुस्तकांच्या गावाला भेट देत आहेत, अशी माहिती संस्थेचे विनय मावळणकर यांनी दिली. शाळेच्या सहली सध्या बंद असल्या तरी वाचन प्रेमी गट, पुस्तक भिशी, वाचन भिशी अशा योजना राबवणारे छोटे समूह भिलारला मुक्कामाला येत असून गेल्या काही महिन्यात अनेक सिने-नाटय़ कलाकार, साहित्यिकांनीही या गावाला भेट दिली, असे मावळणकर यांनी सांगितले.

palghar geography garden marathi news
पालघर: शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात भूगोल उद्यानाची स्थापना, राज्यातील चौथा प्रकल्प
BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
Maharashtras E-crop Inspection project has attracted the Central Government
महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची केंद्राला भुरळ
Planning of extra bus service by state transport due to holidays
नाशिक : सुट्यांमुळे राज्य परिवहनतर्फे जादा बससेवेचे नियोजन

सुखावह बाब..

राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागांतर्गत राज्य मराठी विकास संस्थेमार्फत ‘पुस्तकांचे गांव’ हा प्रकल्प साकारण्यात आला. निसर्गाने समृद्ध असलेल्या या खेडय़ात मराठी साहित्यातील अभिजात ग्रंथांची बेगमी करण्यात आली असून त्यांचा आस्वाद येथे येणाऱ्या पर्यटकांना घेता येतो. करोना कालावधीत शासनाच्या नियमानुसार प्रकल्प बंद ठेवण्यात आला. परंतु शिथिलीकरणानंतर येथील पर्यटन दुपटीने वाढले आहेत.

हॉटेल व्यवसायालाही गती..

 येथे पर्यटकांसाठी ग्रामस्थांकडून अल्प दरात निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली जाते. त्याचबरोबर अनेक पर्यटक निवासासाठी हॉटेलचा पर्याय स्वीकारत असल्याने येथील हॉटेल व्यवसायलाही गती मिळाली आहे. पूर्वी हॉटेलमधील खोल्यांसाठी वर्षांतील १०० ते १५० दिवस मागणी असायची. आता २५० हून अधिक दिवस मागणी असते, अशी माहिती भिलार येथील हॉटेल व्यावसायिकांनी दिली.     

वैशिष्टय़.. 

वाचन संस्कृती वाढीस लागावी म्हणून उभारण्यात आलेला भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे. २०१७ साली तो सुरू झाला.  या प्रकल्पात ३० हजारांहून अधिक पुस्तके आणि ३५ दालनांचा समावेश आहे. कादंबरी, बालसाहित्य, दिवाळी अंक, वर्तमानपत्रे, इतिहास, कविता, संत साहित्य, नाटक, चित्रपट अशी दालने घरोघरी उभी करण्यात आली आहेत . महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणापासून तो नजीक आहे.

निर्बंध शिथिल झाल्यानंतर वाचकांचा मिळणारा प्रतिसाद थक्क करणारा आहे. हा पर्यटनाचा हंगाम असल्याने मार्चपर्यंत असाच प्रतिसाद राहील. जानेवारीपासून येथे येणाऱ्या वाचक पर्यटकांसाठी वाङमयीन चर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला यांचे आयोजन केले जाईल. तसेच नवीन वर्षांत आणखी पाच दालनांची भर या प्रकल्पात पडणार आहे.

संजय कृष्णाजी पाटील, संचालक, राज्य मराठी विकास संस्था