पालघर जिल्ह्यात पर्यटकांचा ओघ ओसरला

पालघर : करोनाची भीती व प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासन-प्रशासनाने केलेले आवाहन याचा दृश्य परिणाम जिल्ह्यातील केळवेसह सर्व समुद्रकिनाऱ्यांवर दिसून येत आहे. येथे मुंबईसह परगावातून तसेच जिल्ह्यातील विविध भागांतून येणाऱ्या पर्यटकांचा ओघ ओसरला आहे.

करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, प्रवास टाळावा, असे आवाहन करत पर्यटनक्षेत्राला भेटी देण्यावरही बंदी घातली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यामुळे मुंबई तसेच अन्य ठिकाणांहून येणारे पर्यटक पालघर जिल्ह्य़ातील समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेले नाहीत. स्थानिक नागरिकांनीही पर्यटकांच्या या भूमिकेचे स्वागत केले असून पर्यटक या भागात वळत नसल्याने या परिसरात करोनाच्या प्रसाराची भीतीही कमी झाली आहे. जिल्हा प्रशासनासह स्थानिक प्रशासनालाही पर्यटकांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे आपली यंत्रणा इतरत्र वापरण्यासाठी मिळणार असल्याने सोयीचे झाले आहे.

केळवे व इतर समुद्रकिनाऱ्यावरील खाद्यगृह, खानावळही बंद ठेवण्यात आल्या असून दक्षता म्हणून प्रशासनाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत प्रशासनाने यासंदर्भात दक्षता घेण्याच्या सूचना हद्दीतील सर्व पर्यटन व्यावसायिकांसह लहान-मोठय़ा खानावळी, खाद्यगृह चालवणाऱ्या आदींना दिल्याने त्यांनी ग्रामपंचायतीने केलेल्या सूचना पाळल्या असल्याचे दिसून येत आहे. नागरिकही याबाबत दक्षता घेत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्य़ात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने खबरदारी म्हणून पर्यटक, व्यावसायिक यांनी केळवे, सुरूबाग या गर्दीच्या ठिकाणी पुढील सूचना येईपर्यंत न येण्याचे आवाहन ग्रामपंचायत केळवेने केले आहे.

 

प्रशासनाने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद स्वागतार्ह आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी याबाबत दक्षता घेणे अपेक्षित आहे. नागरिकांनी आपली नैतिक जबाबदारी म्हणून आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना व दक्षता पाळणे, जागरूकता आणणे आवश्यक आहे, यासाठी जिल्हावासीयांनी सहकार्य करावे.

– डॉ. कैलास शिंदे, जिल्हाधिकारी, पालघर