scorecardresearch

युद्धाच्या नावाने व्यापाऱ्यांकडून लूट ; गहू, तेलाबरोबरच मसाल्याचे पदार्थही महाग

गेल्या आठ दिवसांत सोयाबीन तेलाचे १३० रुपये किलो असणारे दर १६० रुपये झाले आहे.

औरंगाबाद, लातूर : रशियाने युक्रेनवर आक्रमण करताच देशभरात तेल आणि गव्हाची भाववाढ सुरू झाली़  मात्र, आता साखर, खुला आटा, रवा, मैदा, गहू, लाल मिरची, पोहे आदींचीही दरवाढ झाली असून, रशिया-युक्रेन युद्धाच्या नावाने व्यापाऱ्यांकडून लूट सुरू असल्याचे चित्र राज्यात आह़े

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दहा दिवसांत खाद्यतेलांच्या किमतीत वाढ झाली असून, प्रत्येक तेल एका किलोमागे वीस रुपयांनी महागले आहे. भारतीय गव्हाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढली असून, गव्हापासून तयार करण्यात येणाऱ्या मैदा, आटा, रवा, सुजीच्या (जाडा रवा) दरात प्रतिकिलोमागे तीन ते चार रुपयांनी वाढ झाली आहे. मात्र, ज्या जिन्नसांचा थेट आयातीशी काही संबंध नाही, अशा मसाल्याच्या पदार्थाचीही मोठी भाववाढ दिसून येत आहे.

गेल्या आठ दिवसांत सोयाबीन तेलाचे १३० रुपये किलो असणारे दर १६० रुपये झाले आहे. समुद्रीमार्गे होणारी मालवाहतूक विस्कळीत झाल्याने महागाई वाढू शकते, असा अंदाज बांधत  भाववाढ करण्याचे धोरण व्यापारी वर्गाकडून अनुसरण्यात येत आहे. गेल्या शुक्रवारी किराणा माल खरेदी करणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांना सोमवारी दरात झालेली ही दरवाढ खूप अधिक असल्याचे लक्षात आले.

फोडणीसाठी लागणारे जिरे दोन दिवसांपूर्वी २०० रुपये किलो होत़े त्याचा दर आता २५० रुपये किलोपर्यंत गेला आहे. दालचिनी २९० किलोवरून ३३० रुपये किलो, लाल मिरचीचे दर २२० रुपयांवरून २५० रुपयांवर, रवा आणि मैदा हे दरही वाढले आहेत.

दोन दिवसांपूर्वी २ हजार ४६० रुपये क्विंटल असणाऱ्या रव्याचा दर आता २६६० रुपये झाला आह़े  तसेच मैद्यात २०० रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्यात आली आहे. चांगल्या प्रतीच्या शरबती गव्हाच्या किमतीत प्रतिकिलो दोन रुपये वाढ झाली आहे.

कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने देशात लवकरच इंधन दरवाढीचे संकेत आहेत़  मात्र, इंधन दरवाढ झालेली नसतानाच अनेक वस्तूंचे दर वाढले आहेत़  इंधन दरवाढीने त्यात आणखी भर पडणार असून, सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची चिन्हे आहेत़ गहू, तेल, रवा, मैदा यांचे भाव वाढले आहेत. खरे तर गव्हाच्या दरात तातडीची भाववाढ होणे तसे गरजेचे नव्हते. मात्र, गव्हाचे भाव प्रतिकिलो दोन रुपयांनी वाढले आहेत़  मसाल्याच्या पदार्थाचीही भाववाढ झाली आह़े  – सुभाऊ देवरे, किराणा व भुसार माल व्यापारी, औरंगाबाद

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Traders increasing food grain price in the name of russia ukraine war zws

ताज्या बातम्या