कासा  : मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर चारोटी नाक्याजवळ सेवा रस्त्यावर एक जळालेले वाहन वाहतुकीस अडथळा ठरत आहे. मात्र ते हटविण्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे कोंडीत अडकलेल्या वाहनचालक आणि प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.

चारोटी नाक्याजवळ असणाऱ्या पुलाच्या दोन्ही बाजूला अनुक्रमे डहाणू व जव्हारला मार्गे नाशिकला जाण्यासाठी सेवा रस्ता तयार करण्यात आला आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून या रस्त्यावर जळालेले वाहन उभे आहे. या वाहनामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. यामुळे त्या ठिकाणी गंभीर अपघाताची देखील शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या तीन ते चार महिन्यापासून या पुलावर अपघातांची विचित्र मालिका सुरू आहे. हैड्रोजन गॅस वाहून नेणाऱ्या ट्रकला मध्यंतरी अपघात होऊन गॅसच्या टाक्यांचा स्फोट झाला होता. त्यातच या रस्त्यावर अवैध पार्किंगमुळे ही समस्या आणखी उग्ररूप धारण करीत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांनी अनेकदा याबाबत पत्रव्यवहार केला आहे. परंतु प्रशासन मात्र कोणतीही कार्यवाही करताना दिसून येत नाही.

मुंबई शहराला जोडणारा जलदगती मार्ग म्हणून मुंबई-अहमदाबाद हा महामार्ग ओळखला जातो. या महामार्गाच्या लगत औद्योगिक पट्टा असल्याने त्यावरून जड-अवजड वाहनांची देखील सतत वर्दळ सुरू असते. वाहतूक नियंत्रित करून अपघात टाळण्यासाठी तसेच डहाणू व जव्हार, नाशिकला जाण्यासाठी हा सेवा रस्ता बनवण्यात आला आहे. डहाणू व जव्हार, नाशिककडे जाण्यासाठी वळणाऱ्या वाहनांना हा उपयुक्त मार्ग ठरत आहे. त्यामुळे अपघाताचेही प्रमाण बहुतांश नियंत्रित झाले आहे. मात्र या रस्त्यावर बेकायदा पार्किंग सुरू झाल्यामुळे कोंडीही वाढली आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जात असल्याने उर्वरित छोटय़ाशा मार्गातून इतर  चालकांना वाहने चालवावी लागत आहेत. एखाद्या भरधाव वाहनाकडून त्या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. काही महिन्यांपूर्वी वाहतूक पोलिसांनी याच रस्त्यावर उभ्या खासगी वाहनांवर कारवाईदेखील केली होती. मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ अशी आहे, अशी सांगितले जाते.

 

वाहतूक नियंत्रित करण्याच्या दृष्टिकोनातून हा सेवा रस्ता महत्त्वाचा आहे. त्यामुळे या रस्त्यावर  वाहन अवैधरीत्या उभे करणाऱ्या चालकांवर आम्ही दंडात्मक कारवाई करतो.

– विलास मते, सहायक पोलीस निरीक्षक महामार्ग पोलीस चारोटी

 

सेवा रस्ता वाहतूक नियंत्रित करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. रस्त्यावर जळलेले वाहन कित्येक दिवसांपासून उभे आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी ते वाहन लवकरात लवकर हटवावे, अशी आमची मागणी आहे.

-रावसाहेब जाधव