अलिबाग: मंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. महामार्गावर घाट परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे.

टँकर अपघातामुळे विस्कळीत झालेली मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक गुरुवारी सुरळीत झाली. त्यामुळे शुक्रवारी पहाटेपासून मुंबईत अडकून पडलेले प्रवासी मोठ्या संख्येनी पुण्याच्या दिशेने निघाले, त्यामुळे पुणे मार्गीकेवर खालापूर टोल नाक्यापासून बोर घाटातील अमृतांजन ब्रीज पर्यंतच्या परीसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दहा किलोमीटरच्या परिसरात वाहनांची कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूकीचा वेग मंदावला आहे.

सलग सुट्ट्यामुळे वाहनांची संख्या वाढल्याचे सांगितले जात आहे. महामार्ग पोलीसांनी पुण्याच्या दिशेने जाणारी वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी मुंबई मार्गिकेवर ब्लॉक घेतला आहे. पुण्याकडील वाहतूक मुंबई मार्गिकेवर वळवून वाहनांची गर्दी कमी केली जात आहे. त्यामुळे घाटपरीसरातील वाहतुक कोंडी लवकरच कमी होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

अवजड वाहने रोखली…

महामार्गावर झालेली वाहतुक कोंडी लक्षात घेऊन आता अवजड वाहने रोखण्याचे काम पोलीसांनी सुरू केले आहे. पुण्याच्या दिशेने जाणारी अवजड वाहने बाजूला पार्कीग करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे घाट परिसरातील कोंडी सुटण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

जुन्या मुंबई पुणे महामार्गावरही बोरघाटात वाहनांच्या रांगा…

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावरील वाहतुक कोलमडली असतांनाच आता जुन्या मुंबई पुणे महामार्गावरही बोरघाटात वाहतूक कोंडी निर्माण झाल्याची बाब समोर आली आहे. बोरघाटात शिंघ्रोबा मंदीर परिसरात एका अवघड वळणावर पाईप घेऊन जाणारा ट्रक बंद पडला आहे. तर कार्ला येथील एकविरा देवीला जाणारी पालखीही याच परिसरातून मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे या मार्गावरील पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीचा वेग मंदावला आहे. बंद पडलेला ट्रक बाजूला करण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.