परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प

परशुराम घाटात दरड कोसळण्याचे सत्र गेल्या सोमवारपासून सुरू आहे.

चिपळूण :  मुंबई-गोवा महामार्गावर  परशुराम घाटात दरड कोसळण्याची मालिका बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी सुरू असून  ती हटवण्यासाठी दोन्ही बाजूंनी तब्बल दीड तास वाहतूक थांबवण्यात आली. त्यामुळे वाहन चालक अक्षरश हैराण झाले.

परशुराम घाटात दरड कोसळण्याचे सत्र गेल्या सोमवारपासून सुरू आहे. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सकाळी साडेनऊच्या सुमारास या घाटातील दरड कोसळली. ती  हटवण्याचे काम दुपारी सुरू झाले. नंतर एकेरी वाहतूक सुरू झाली. मंगळवारी काम पुढे चालू असताना दुपारी पुन्हा दरड कोसळली. त्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. एका बाजूने दरड हटवण्याचे काम सुरू असताना दुसर्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू झाली. मंगळवारी सांयकाळी दोन्ही दरडी हटविण्यात आल्या. त्यानंतर महामार्ग पूर्णपणे मोकळा होता. पण बुधवारी दुपारी पुन्हा दरड कोसळली. मातीसह मोठे दगड रस्त्यावर आल्यामुळे रस्ता बंद झाला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक पुन्हा बंद पडून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या. सुमारे दीड तासात  दरड हटवल्यानंतर ती  मार्गस्थ झाली.

चिवेलीतील वाहतूक सुरळीत

दरम्यान तालुक्यातील चिवेली मार्गावर घाटात दरड कोसळल्यामुळे पर्यायी चिवेली – गोंधळे रस्त्याच्या दुरुस्तीला बुधवारपासून सुरवात करण्यात आली आहे.

तालुक्यातील कौंढरताम्हाणे ते चिवेली दरम्यानचा रस्ता प्रधानमंत्री सडक योजनेतून झाला आहे. मात्र चिवेली घाटात सतत मोठ्या दरडी कोसळत आहेत. त्यामुळे घाट वाहतुकीस धोकादायक बनला आहे. कोसळलेल्या दरडीचा भाग काढण्याचे काम मंगळवारपासून सुरू आहे.

दरम्यान चिवेली मार्गावरील वाहतूक सुरू राहण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. चिवेली गोंधळे हा पर्यायी रस्ता कच्चा असल्याने येथून सार्वजनिक वाहतूक शक्य नाही. त्यासाठी जेसीबी आणि डंपरच्या साह्याने या रस्त्याच्या डागडुजीस सुरवात करण्यात आली. हे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गाने एस.टी. वाहतूक सुरू करण्याचे नियोजन आहे. यापूर्वी गोंधळे माग्रे एस.टी. वाहतूक सुरू होती. पर्यायी मार्गाची दुरुस्ती झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांत जाता येणार आहे.

रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी पंचायत समिती सदस्य नंदकिशोर शिर्के, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व प्रमुख ग्रामस्थ घटनास्थळी ठाण मांडून होते. चिवेली घाटात कोसळलेली दरड काढली तरी पुन्हा पुन्हा दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. दरड केव्हा कोसळेल याची शास्वती नाही. त्यामुळे प्रशासनाने घाटात कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Traffic jam due to landslide at parshuram ghat zws