अलिबाग – मुंबई पुणे दृतगती महामार्गावर आडोशी बोगद्या जवळ टँक अपघातानंतर २४ तास उलटले तरी महामार्गावरील वाहतूक सुरळीत होऊ शकलेली नाही. त्यामुळे प्रवाश्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गॅस टँकरला रायगड जिल्ह्यातील आडोशी बोगद्या जवळ अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर उलटला, अपघातामुळे टँकरला तीन ठिकाणी गळती सुरू झाली. या गळतीमुळे टँकर मधून प्रॉपलिन हा अतिज्वलनशील वायू बाहेर येऊ लागला. त्यामुळे खबरदारी म्हणून मुंबई मार्गिकेवरील वाहतूक बंद करण्यात आली.

२४ तासांनंतरही ही वाहतूक पुर्ववत होऊ शकलेली नाही. त्यामुळे प्रवाश्यांचे बुधवारी आतोनात हाल झाले. बोरघाटात दहा ते पंधरा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अभूतपूर्व कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे प्रवाश्यांना अन्न पाण्याविना तासंतास एकाच जागी बसून रहावे लागले, वाहतुक कोंडी कधी सुटणार याची माहिती दिली जात नव्हती त्यामुळे प्रवाश्यांनी संताप व्यक्त केला.

मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता अमृतांजन ब्रीज जवळ वाहतूक कोंडीत अडकून पडलो, रात्री अडीच वाजे पर्यंत गाडी त्याच ठिकाणी होती . आपत्कालीन परिस्थितीत गाडी परत फिरवण्याची कुठलीच सोय नव्हती, घाटात अडकून पडल्याने लहान मुले महिलांचे खुपच हाल झाले. घाटात अडकून पडल्याने अन्न पाण्याचीही व्यवस्था करता आली नाही असे निखिल लेले यांनी दिली.

काल संध्याकाळी पाच वाजता दुर्घटना झाली, २४ तास होत आले पण दुर्घटनाग्रस्त वाहनबाजूला करता आलेले नाही, लोकांचे हाल होत आहेत. सोबत असलेले अन्न पाणी संपले आहे. प्रशासनाकडून वाहतुक कधी सुरू होणार याची काहीच कल्पना दिली जात नाही असा संताप सोपान दळवी यांनी व्यक्त केला.

एसटीने मुंबईला निघालो होतो, अपघाताची कल्पना नव्हती महामार्गावर अडकून पडलो, ना प्यायला पाणी आहे. ना खायला अन्न तसेच बसून आहोत. पाच सहा तास झाले. वाहतुक कधी पुर्ववत होणार कोणीच माहिती देत नाही अशी नाराजी संजय पाटील यांनी व्यक्त केली.