रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक नियमितपणे सुरू करण्यात आली आहे. मात्र, एका बाजूला डोंगर कटाईसह चौपदरीकरणाचे काम पावसाळा सुरू होईपर्यंत चालू राहणार आहे. परशुराम घाटातील चौपदरीकरणाच्या कामाला गती मिळावी म्हणून गेल्या २५ एप्रिलपासून दुपारी १२ ते सायंकाळी ६ या काळात ५ तास वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता. या कालावधीत पूर्ण क्षमतेने चौपदरीकरणाचे काम चालू होते. त्यातून सुमारे ६५ टक्के  काम पूर्णत्वाला गेले आहे. ईगल कंपनीने डोंगर कटाई सुरू ठेवलेली असतानाच ७०० मीटपर्यंतचे रस्ता काँक्रीटीकरणही पूर्ण केले आहे. याच पद्धतीने खेड हद्दीत कल्याण टोलवेज कंपनीचे अवघड टप्प्यात काम सुरू आहे. त्यासाठी बेंचिंग पद्धतीने डोंगर कटाई केली असून, दरडी कोसळण्याचा धोका कमी केला आहे. त्यामुळे पुढील टप्प्यात वाहतूक सुरू असताना उर्वरित डोंगर कटाईचे काम सुरू ठेवले आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत हे काम नियमितपणे सुरू ठेवले जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

  घाट बंद असताना महामार्गावरील वाहतूक कळंबस्ते ते चिरणीमार्गे वळविण्यात आली होती, परंतु यामार्गे मोठा वळसा घेऊन जावा लागत असल्याने वाहतूकदार हैराण झाले होते तसेच कळंबस्ते येथील रेल्वे ट्रॅक, आंबडस (खेड) येथील अरुंद व धोकादायक पूल, खचलेल्या साईड पट्टय़ामुळे हा मार्ग धोकादायक होता. त्यामुळे घाट सुरू होण्याबाबत एस. टी. महामंडळासह लोटेतील कामगारांनाही उत्सुकता होती. अखेर जिल्हाधिकारी  यांनी २५ मे रोजी घाट नियमितपणे सुरू ठेवण्याचे संकेत देताच दोन्ही बाजूला ठेवलेला पोलीस बंदोबस्त गुरुवारपासून हटविण्यात आला. दरम्यान वाहतूक सुरू केली असली तरी चौपदरीकरण चालूच राहणार आहे. खडक लागलेल्या ठिकाणी तीन ते चार ड्रिल मशीन लावून कामाचा वेग वाढवला आहे. तसेच रस्त्यालगतचे दगड व माती हटवून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी चरही खणले जात आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic resumes parashuram ghat mumbai goa highway transportation regularly ysh
First published on: 28-05-2022 at 00:02 IST