यवतमाळमध्ये वैद्यकीय विद्यार्थ्यांची हत्या ; डॉक्टर्स, विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात ठिय्या आंदोलन

मारेकऱ्यांना तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्या, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात ठिय्या आंदोलन केले.

अधिष्ठात्यांचा राजीनामा

यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तृतीय वर्षांला असलेल्या विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री ९च्या सुमारास घडली. अशोक पाल, रा. ठाणे (मूळ गाव जौनपूर, उत्तर प्रदेश) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. या घटनेने वैद्यकीय महाविद्यालयात प्रचंड खळबळ उडाली असून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह परीविक्षाधीन डॉक्टर्स, निवासी विद्यार्थी यांनी आक्रमक भूमिका घेऊन आरोपींच्या अटकेसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले.

दरम्यान, विद्यार्थी ठिय्या आंदोलन मागे घ्यायला तयार नसल्याने अखेर महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी सायंकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 

अशोक पाल हा बुधवारी रात्री महाविद्यालय परिसरातील ग्रंथालयातून वसतिगृहाकडे जात होता. अनोळखी मारेकऱ्यांनी त्याला वाटेत अडवले व त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. तो मरण पावला असे समजून  जखमी अवस्थेत त्याला तेथेच सोडून मारेकरी पळून गेले. ही बाब परिसरातील काही विद्यार्थी व नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अशोकला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. या घटनेच्या निषेधार्थ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. मारेकऱ्यांना तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्या, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात ठिय्या आंदोलन केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महाविद्यालयात पोहचून आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांशी चर्चा केली. मात्र आरोपींना अटक होऊन कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याच्या निर्णयावर विद्यार्थी ठाम होते. वैद्यकीय महाविद्यालयातील अनागोंदीचा यावेळी विद्यार्थ्यांनी मुर्दाबादच्या घोषणा देऊन निषेध नोंदवला. पोलिसांनी परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे.

डॉक्टर-विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजनेची मार्डची मागणी

मुंबई:  यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षांचा विद्यार्थी डॉ. अशोक पाल याची बुधवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर रुग्णालयाच्या आवारात डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत असून यासंबंधी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने केली आहे.

अशोक हा अत्यंत हुशार आणि शांत विद्यार्थी होता. बुधवारी रात्री आठच्या सुमारास तो ग्रंथालयातून वसतिगृहाकडे परत येत असताना रुग्णालयाच्या आवारातच त्याचा खून झाला. रुग्णालयाच्या परिसरात आवश्यक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध असती तर हा प्रसंग टाळता आला असता. या घटनेनंतर निवासी डॉक्टर आणि विद्यार्थी हादरून गेले असून रुग्णालय आवारात राहणे कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न निर्माण होत असल्याचे मार्डच्या सदस्यांनी सांगितले.

या घटनेतील गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करून गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मार्डने वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे. यासह डॉक्टर आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने रुग्णालयाच्या आवारात उपाययोजना करण्याची मागणीही मार्डने केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Trainee student doctor killed medical student murder in yavatmal zws

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या