परिविक्षाधीन काळात इतवारा उपविभागप्रमुख, तसेच पोलीस उपअधीक्षक (गृह) या पदांची जबाबदारी पार पाडल्यानंतर आयपीएस पंकज देशमुख यांची बदली अहमदनगर येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदावर झाली, तर येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांची बारामती येथे याच पदावर बदली झाली. त्यांच्या जागी एस. वाय. धिवरे येथे येत आहेत.
अधीक्षक व अतिरिक्त अधीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी सायंकाळी निघाले. तत्पूर्वी त्याहून वरच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी बाहेर पडली. नांदेडला उपअधीक्षक राहिलेले महेश पाटील मुंबईत झोन पाचचे पोलीस उपायुक्त होते. त्यांची बदली राज्य गुन्हे अन्वेषण विभागात झाली. येथे नागरी हक्क संरक्षण विभागाचे अधीक्षक म्हणून सुनील भारद्वाज येत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अधीक्षक म्हणून सोलापूरहून एस. एम. परोपकारी येथे येत आहेत. नांदेडचे भूमिपुत्र नवीनचंद्र रेड्डी बीडहून औरंगाबाद येथे पोलीस अधीक्षकपदी (ग्रामीण) बदलून जात आहेत. बिलोली उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची बदली परभणी येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदी झाली. मात्र, बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या पोलीस अधीक्षकांचे नाव या यादीत नाही.
नांदेडचे माजी पोलीस अधीक्षक विठ्ठल जाधव यांची मुंबईहून नागपूर येथे झालेली बदली रद्द करून त्यांना मुंबई पोलीस आयुक्तालयात अतिरिक्त आयुक्तपद बहाल करण्यात आले. नवी मुंबईतील अतिरिक्त पोलीस आयुक्त फत्तेसिंह पाटील यांचीही मुंबईला बदली झाल्याचे समजले. पाटील हेही पूर्वी नांदेडचे पोलीस अधीक्षक होते. नांदेडला काही काळ सेवा बजावलेले कृष्णप्रकाश यांची नियुक्ती सीआयडीच्या (क्राइम) महानिरीक्षकपदी पुणे येथे करण्यात आली.