कामावर रुजू व्हा, अन्यथा वेतनवाढीचा पुनर्विचार; संपावरील एसटी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्र्यांचा इशारा

कर्मचाऱ्यांना हवी असलेली वेतनवाढ देण्यात आली आहे. संप सुरू असताना आता कोणत्याही वाटाघाटी होणार नाहीत.

कर्मचाऱ्यांना हवी असलेली वेतनवाढ देण्यात आली आहे. संप सुरू असताना आता कोणत्याही वाटाघाटी होणार नाहीत. संपावर कायम राहिले तर वेतनवाढ द्यायची की नाही, हे ठरवावे लागेल, असा इशारा परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना शुक्रवारी दिला.

संपाबाबत कामगार न्यायालयाचाही पुढील आठवड्यात निर्णय येणार आहे. या न्यायालयानेही संप बेकायदा ठरविल्यास एका दिवसामागे आठ दिवसांच्या वेतनाची कपात करण्याच्या कारवाईचाही विचार होईल, असे परब यांनी सांगितले. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संपावर गेलेले कर्मचारी पुन्हा रुजू होत आहेत. शनिवारपर्यंत आणखी काही कामगार कामावर येतील. एसटी बंद करणे हे सरकार, एसटी आणि ग्रामीण भागातील जनतेलाही परवडणारे नाही, असे परब  म्हणाले. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर समितीचा अहवाल आल्यानंतरच चर्चा होईल. २० डिसेंबरपर्यंत न्यायालयाला त्याबाबतचा प्राथमिक अहवालही द्यायचा आहे, असे परब म्हणाले. 

कृती समितीबरोबरही बैठक

एसटीतील १७ कर्मचारी संघटनाच्या कृती समितीने परिवहनमंत्री अनिल परब यांची भेट घेतली. त्यावेळी कनिष्ठ आणि वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनातील फरक, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करणे यावर चर्चा झाली. यावेळी दहा वर्षांचा वेतन करार करण्याची मागणीही करण्यात आली. परंतु कामगार संघटनांबरोबरच चार वर्षांचा करार केला जातो. आता करार केल्यावर किती फरक पडेल? दहा वर्षांचा करार करणे कितपत योग्य? किती ओझे पडेल? इत्यादींचा विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

१७ कामगार संघटनांचा संप मागे घेण्यास पुढाकार

 एसटीच्या१७ कामगार संघटनांच्या कृती समितीने संप मागे घेण्यास पुढाकार घेतला. परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केल्यानंतर संपकरी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आणि वाहतूक सुरू करण्याचे आवाहन केले, अशी माहिती समितीतील मान्यताप्राप्त संघटनेचे अध्यक्ष संदीर्प ंशदे यांनी  दिली. 

 यापुढे वाटाघाटी नाहीत : अनिल परब

संप मागे घ्यावा, असे आवाहन वारंवार करीत आहोत. तरीही तिढा कायम आहे. असेच सुरू राहिले तर आम्हाला वेगवेगळे पर्याय शोधावे लागतील, असे परिवहनमंत्री परब यांनी स्पष्ट केले. महत्त्वाची बाब म्हणजे कर्मचाऱ्यांना हवी असलेली वेतनवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता यापुढे कोणत्याही वाटाघाटी होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

कारवाईत वाढ

‘एसटी’तील ३५० रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा शुक्रवारी समाप्त करण्यात आली. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांची एकूण संख्या १,२२६ वर पोहोचली आहे. रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांची संख्या २,६३२ असून २,५४५ कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. एक ते दोन दिवसांत रोजंदारीवरील आणखी ५०० कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात येणार आहे. तर एसटीतील नियमित सेवेत असलेल्या तीन हजार २१५ कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

३७ आगारांतील सेवा सुरू

राज्यातील २५० पैकी ३७ आगारांतून एसटी धावू लागल्या आहेत. त्यात मुंबई सेन्ट्रल, परळ, ठाणे एक आणि कल्याण, पुणे विभागातील स्वारगेट, शिवाजी नगर आणि दौंड आगारांचा समावेश आहे. याशिवाय नाशिक, कोल्हापूर, धुळे, जळगाव, सातारा, पालघर, रत्नागिरी, रायगड, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, सांगली या विभागांतील आगारांतून एसटी सेवा सुरू झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ३१५ एसटी गाड्यांमधून ९,५५१ प्रवाशांनी प्रवास केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Transport minister anil parab warning to st workers on strike abn

ताज्या बातम्या