scorecardresearch

परभणीत पक्षद्रोहाची परंपरा खंडित; राजकीय पडझडीत शिवसेनेचा बालेकिल्ला शाबूत

१९८९ पासून सातत्याने लोकसभा व विधानसभेवर भगवा फडकत असल्याने शिवसेनेचा बालेकिल्ला अशी राजकीय वर्तुळात परभणीची सर्वदूर ख्याती असली तरी पक्षद्रोहाचाही मोठा इतिहास या जिल्ह्याला आहे.

Shivsena flag
प्रतिनिधिक छायाचित्र

आसाराम लोमटे

परभणी : १९८९ पासून सातत्याने लोकसभा व विधानसभेवर भगवा फडकत असल्याने शिवसेनेचा बालेकिल्ला अशी राजकीय वर्तुळात परभणीची सर्वदूर ख्याती असली तरी पक्षद्रोहाचाही मोठा इतिहास या जिल्ह्याला आहे. आजवरच्या सेनेच्या प्रत्येक बंडात परभणीचा वाटा राहत आला. छगन भुजबळ, नारायण राणे यांनी केलेल्या बंडात परभणीचे सेनेचे लोकप्रतिनिधी सहभागी होते. या वेळी मात्र खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील यांनी आपण पक्षनेतृत्वासोबत ठाम असल्याचे जाहीर करून सध्याच्या पडझडीत शिवसेनेचा बालेकिल्ला शाबूत असल्याचे दाखवून दिले आहे. जिल्ह्यात बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिकांनी तीव्र निदर्शने केली आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीला शिवसेनेचा हा बालेकिल्ला भेदता आला नाही. आता समीकरणे बदलली आहेत. यापुढची शिवसेनेची लोकसभेची लढाई राष्ट्रवादीशी नसून भाजपशी आहे. सेनेचा यापुढचा सामना भाजपशी असल्याने या लढाईत काय होणार, सेनेच्या पारंपरिक मतदारांची भूमिका काय असणार, हे प्रश्न सध्या शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वर्तुळात चर्चिले जात आहेत.

नव्वदच्या दशकात मराठवाडय़ात शिवसेनेची लाट आल्यानंतर काँग्रेसचे अनेक बुरूज ढासळले. त्यात परभणीचाही समावेश होतो. आक्रमक तरुणाईच्या बळावर शिवसेनेने राजकारणातली उलथापालथ केली. १९८९ च्या निवडणुकीत प्रा. अशोक देशमुख यांना शिवसेनेने उमेदवारी दिली.

१९९१ च्या लोकसभा निवडणुकीत देशमुख शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावर निवडून आले. पुढे केंद्रातले नरसिंह राव यांचे सरकार वाचविण्यासाठी त्यांनी पक्षाशी द्रोह केला. त्याची बक्षिशी म्हणून त्यांना १९९६ च्या निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारीही मिळाली. त्या वेळी त्यांच्याविरुद्ध कोणतीच राजकीय ओळख नसणाऱ्या सुरेश जाधव यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. केवळ गंगाखेडचे तालुकाप्रमुख एवढीच त्यांची ओळख होती. त्या वेळी राजकारणात अतिशय नवख्या असलेल्या जाधव यांनी अशोक देशमुख यांचा दारुण पराभव केला.

लोकसभेच्या १९९८ च्या मुदतपूर्व निवडणुकीत काँग्रेसने सुरेश वरपूडकर यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी शिवसेनेच्या जाधव यांचा सरळ लढतीत पराभव केला. एवढा एकमेव अपवादात्मक असा पराभव शिवसेनेच्या वाटय़ाला या मतदारसंघात आला आहे. १९९९ मध्ये शिवसेनेने मतदारसंघ पुन्हा जिंकला. २००४ मध्ये शिवसेनेचे तुकाराम रेंगे-पाटील हे लोकसभेवर निवडून आले. पण  अणू करारावरून झालेल्या मतदानाच्या वेळी पक्षादेश झुगारून केंद्र सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानास अनुपस्थित राहून रेंगे यांनी शिवसेनेशी पक्षद्रोह केला. आपली पक्षात घुसमट होत असल्याचे जाहीर करून त्यांनी काँग्रेसशी सलगी वाढवली.

खासदार फुटीचा शाप

असलेल्या शिवसेनेने २००९ मध्ये अनोखा प्रयोग केला. निवडून आलेला खासदार पक्षाबाहेर पडतो असा इतिहास असलेल्या शिवसेनेने पक्षाबाहेरून आलेल्या माजी मंत्री गणेश दुधगावकरांनाच उमेदवारी दिली आणि ते निवडून आले. काँग्रेसी संस्कृतीत वाढलेल्या दुधगावकरांना पुढे शिवसेना मानवली नाही. खासदारकीचा कालावधी संपत असतानाच दुधगावकर यांनी शिवसेनेशी अंतर कायम ठेवले. अशा प्रकारे अशोक देशमुख, सुरेश जाधव, तुकाराम रेंगे, गणेश दुधगावकर अशी शिवसेनेच्या पक्षद्रोह केलेल्या खासदारांची परंपरा आहे.

खासदारांच्या पक्षद्रोहाचा इतिहास

१९९१ मध्ये छगन भुजबळ यांनी सेनेत बंड केले तेव्हा परभणीचे आमदार हनुमंत बोबडे हे होते. एकदा दगाफटका करून बोबडे यांनी परत शिवसेनेच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला होता. आपण चक्रव्यूह भेदून आलेला अभिमन्यू आहोतह्ण या शब्दांत त्यांनी स्वत:चे वर्णन केले होते, मात्र पुन्हा ते शिवसेनेच्या बाहेर पडले. अर्थात परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या खासदारांची पक्षद्रोह करण्याची मालिका मात्र फार मोठी आहे. या कृतीला शिवसेनेत गद्दारीह्ण असे नाव आहे.

मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला शिवसेनेने भरभरून दिले आहे. शिवसेनेवर माझी अविचल निष्ठा आहे. ती कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील. ठाकरे कुटुंबाविषयी माझ्या मनात नितांत आदराची भावना आहे, जणू माझ्यासाठी हे गुरू घराणेच आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे या सर्वाचाच शब्द आमच्यासाठी कायम महत्त्वाचा आहे. मात्र सध्या जे घडतेय ते दुर्दैवी आहे.

– संजय जाधव, खासदार, परभणी

युवासेनेच्या स्थापनेपासून मी शिवसेनेबरोबर आहे. एक जीवन, एक पक्ष हीच

भूमिका असल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबतच शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार.

– राहुल पाटील, आमदार, परभणी

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Treason stronghold intact political fall loksabha legislative assembly ysh

ताज्या बातम्या