दोन दिवसांत २५ महिला उपचारार्थ दाखल

वसई : वसई-विरार शहरातील करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात गर्भवती महिला व लहान बालके यांनाही करोनाची लागण होत आहे. हीच बाब लक्षात घेऊन वसई-विरार महापालिकेने कोविडची लागण झालेल्या व तशी लक्षणे असलेल्या गर्भवती महिलांच्या उपचारासाठी नायगाव पूर्व जूचंद्र येथील माता बालसंगोपन केंद्रात करोना उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे.

जूचंद्र येथे महापालिकेचे माता बालसंगोपन केंद्र आहे. या केंद्रात सुरुवातीला सर्वसामान्य गर्भवती महिलांची प्रसूती केली जात होती. परंतु शहरातील करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ज्या गर्भवती महिलेला करोनाची लागण व तशी लक्षणे असणाऱ्या महिलांना वेळीच उपचार मिळणे गरजेचे आहे. यासाठी पालिकेने सर्वसामान्य प्रसूतीसाठी असलेले जूचंद्र येथील माता बालसंगोपन केंद्र बंद करून त्या ठिकाणी फक्त करोनाबाधित गर्भवती महिलांच्या उपचारासाठी हे केंद्र सुरू केले असल्याची माहीती पालिकेने दिली आहे.

या केंद्रात २५ खाटा ठेवण्यात आल्या असून ३ खाटा अतिदक्षतेसाठी ठेवल्या आहेत. तर प्राणवायूचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. करोना रुग्णांच्या उपचारासाठी ज्या काही सोयीसुविधांची गरज आहे अशा सर्व सुविधा केंद्रात उपलब्ध करून दिल्या आहेत. दोन दिवसांतच या २५ खाटा करोनाबाधित गर्भवती महिलांनी भरून गेल्या असून त्यावर पालिकेचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक व इतर कर्मचारी यांच्यामार्फत सेवा पुरवली जात आहे.

प्रसूतीसाठी इतर माता बालसंगोपन केंद्रात जूचंद्र येथील माता बालसंगोपन केंद्र हे विशेष करून गर्भवती महिलांसाठी करोना उपचार केंद्र सुरू केल्याने आता या ठिकाणी होत असलेली सर्वसामान्य महिलांची प्रसूती बंद करून ती आता पालिकेच्या सातीवली येथील माता बालसंगोपन केंद्र व तुळींज येथील सर्वोदय माता बालसंगोपन केंद्रात केली जाणार आहे. त्या ठिकाणी आता नॉनकोविड गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी जावे लागणार आहे.