मुंबई : पर्यटकांना राज्यातील आदिवासी संस्कृतीचा, पाहुणचाराचा अनोखा अनुभव देण्याबरोबरच पर्यटनातून रोजगार निर्माण करण्यासाठी चार जिल्ह्यांत अनोखा ‘ट्रायबल टुरिझम’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

यात महाराष्ट्रातील आदिवासी संस्कृती, लोककला, हस्तकला, लोकपरंपरा आणि ग्रामीण जीवनशैलीचा प्रत्यक्ष अनुभव पर्यटकांना मिळेल. नाशिक, अहमदनगर, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांतील निवडक आदिवासी गावांमध्ये ‘इंटॅन्जिबल कल्चरल हेरिटेज (आयसीएच) आधारित आदिवासी पर्यटन’ योजनेतून हे साध्य होणार आहे. या योजनेला राज्य सरकारने मंजुरी दिली असून त्यासाठी २.५७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याकरिता केंद्र सरकारकडूनही निधी उपलब्ध होणार आहे.

यात दोन आदिवासी समुदाय संग्रहालय (कम्युनिटी म्युझियम), पाच आदिवासी सांस्कृतिक महोत्सव, लोककला व परंपरांचे दृकश्राव्य दस्तावेजीकरण, पर्यटनासाठी स्थानिक युवकांचे प्रशिक्षण, तसेच पर्यटनाच्या प्रचारासाठी संकेतस्थळ, सोशल मीडिया आणि विविध महोत्सवांमध्ये सहभाग अशा उपक्रमांचा समावेश आहे.

राज्य सरकारच्या मते, या प्रकल्पामुळे सुमारे एक हजार आदिवासी कलाकार, कारागीर आणि पारंपरिक ज्ञान जपणाऱ्या व्यक्तींना थेट लाभ होईल. पर्यटकांसाठी घरगुती निवास (होमस्टे), स्थानिक मार्गदर्शक सेवा, पारंपरिक खाद्यसंस्कृती, हस्तकला विक्री आणि सांस्कृतिक सादरीकरणातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याचा सरकारचा विचार आहे.

योजना दोन वर्षे राबविण्यात येणार असून शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत तिची अंमलबजावणी केली जाणार आहे. प्रकल्पाच्या प्रगतीवर देखरेख करण्यासाठी स्वतंत्र सल्लागार व सनियंत्रण समितीही स्थापन करण्यात आली आहे.

योजनेतील ठळक बाबी

  • नाशिक, अहमदनगर, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांतील निवडक आदिवासी गावे
  • २.५७ कोटींची तरतूद
  • दोन कम्युनिटी म्युझियम
  • पाच आदिवासी सांस्कृतिक महोत्सव
  • सुमारे एक हजार आदिवासींना थेट लाभ
  • होमस्टे, स्थानिक मार्गदर्शक, हस्तकला व पाककलेला पर्यटनाशी जोडण्याचा प्रयत्न