करोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेली टाळेबंदी अनेकांच्या जिवावर उठत असून त्याचा सर्वाधिक फटका गाव, शहरांपासून दूर राहणाऱ्या दुर्गम भागातील आदिवासींना बसू लागला आहे. तुटपुंजी मदत, अपुरा शिधा आणि हाती नसलेला पैसा यांमुळे आदिवासींना जंगलातील कंदमुळे, रानकेळी खाऊ न गुजराण करावी लागत आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील माळशेज घाट, नाणे घाट आणि दाऱ्या घाटाच्या भागात सध्या हे चित्र मोठय़ा प्रमाणावर पाहायला मिळत आहे. करोनाच्या संकटामुळे उपासमारीची वेळ आली असताना निसर्गाने मात्र आदिवासींना साथ दिली आहे.

टाळेबंदीमुळे गाव, शहरांपासून दुर्गम भागांत राहणाऱ्या आदिवासींच्या हाताला रोजगार नाही. पाचवीला पुजलेल्या दारिद्रय़ाचा सामना करत असताना आलेल्या टाळेबंदीमुळे हाती असलेले कामही गेल्याचा ताण आता आदिवासी वस्त्यांमध्ये दिसू लागला आहे. टाळेबंदी असल्याने बाहेर जाण्याचा मार्ग खुंटला आहे. अशा परिस्थितीत काही लोकप्रतिनिधींनी काही दिवसांचा शिधा देऊन डझनवारी छायाचित्रे काढून घेतली. शिधा दुकानदारांनी फक्त तांदूळ दिला. मग अशा परिस्थितीत आपल्या कुटुंबाला जगवायचे कसे, असा सवाल मुरबाड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या दुर्गम भागातील आदिवासी बांधवांसमोर आ वासून उभा आहे.

ठाणे आणि पुणे जिल्ह्याच्या वेशीवर असलेल्या माळशेज, नाणे आणि दाऱ्या घाटांच्या परिसरात अनेक आदिवासी वाडय़ा आहेत. उंबरवाडी, वाघाची वाडी, काटय़ाची वाडी, टेमवाडी, शेंडय़ाची वाडी या भागांत दीडशे ते २०० कुटुंबे वास्तव्यास आहेत. रानमेवा, मासे, मध, डिंक विकून, थोडीफार मोलमजुरी करून त्यांची गुजराण होत होती. करोना काळात सर्व गोष्टी बंद असल्याने आणि घरातील शिधा संपल्याने या आदिवासींवर कंदमुळे खाण्याची वेळ आली आहे. त्याचसोबत रानकेळी अर्थात कौदर हेही या आदिवासींचे प्रमुख अन्न बनले आहे. केळीच्या खोडातील कंद आणि गाभा याचा वापर जेवणात सुरू केला आहे. शासनाने वाटलेला शिधा किती दिवस पुरेल माहीत नाही. मात्र भविष्याचा विचार करून सध्या आम्ही रानकेळी आणि कंद जेवणासाठी वापरत असल्याचे उंबरवाडीचे नवसू नामा पारधी यांनी सांगितले. त्यामुळे नियोजनशून्य राजव्यवस्थेने मारल्यानंतर अखेर आदिवासींना त्यांच्या हक्काच्या निसर्गाने तारल्याची भावना त्यांच्याकडून व्यक्त होते आहे.