पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांकडून खंडणी वसूल करण्याचे काम कामगारमंत्री हसन मुश्रीफ व त्यांचे टोळके करीत आहे. त्यांच्या जाचाला कंटाळूनच उद्योजक कर्नाटकात स्थलांतरित होत आहेत. या निवडणुकीत मुश्रीफांसह बारामतीकरांना अस्मान दाखविण्यात येईल, अशी घणाघाती टीका महायुतीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी सोमवारी येथे बोलतांना केली.    
कोल्हपूर लोकसभा मतदारसंघातील करवीर, शहर उत्तर व दक्षिण अशा तीन विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा मेळावा अमृतसिध्दी मंगल कार्यालय येथे आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख संजय पवार होते. मंडलिक म्हणाले,की लोकसभेसाठी जिल्हाप्रमुख विजय देवणेंची उमेदवारी निश्चित होती. महायुती आकाराला आल्यानंतर उमेदवारीवर माझी वर्णी लागली. पुरोगामी विचाराच्या मंडलिकांनी तत्त्वाला तिलांजली दिल्याचे आरोप विरोधक करीत आहेत, मात्र स्वतला पुरोगामी म्हणविणाऱ्यांनी आत्तापर्यंत जनतेला फसविण्याचे काम केले आहे. जिल्हा परिषद व हमिदवाडा कारखान्याची निवडणूक जिंकून मंडलिक गटाने मुश्रीफांवर मात केली, तरी ते अजूनही बदलण्यास तयार नाहीत. आपला माणूस अशी जाहीरातबाजी करणारा उमेदवार ढपला संस्कृतीत तरबेज आहे, अशी टीका त्यांनी धनंजय महाडिक यांचे नांव न घेता केली.     
जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले,की संजय मंडलिक व विजय देवणे हे एकच आहेत असे समजून कार्यकर्त्यांनी प्रचाराला लागावे. खासदार मंडलिक यांनी कागल तालुक्यात विकासाची गंगा आणल्याने लोकसभा निवडणुकीत कागलकर मुश्रीफांना त्यांची जागा दाखवून देतील. लोकसभेत महाडिकांचा पराभव झाल्यास राजीनामा देऊ म्हणणाऱ्या मुश्रीफांना जनता धडा शिकवेल.     
आमदार चंद्रदीप नरके यांनी, शिवसेनेने आंदोलन केल्यानंतर लोकांचे प्रश्न सुटत असतील तर शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ती का चालत नाही, असा प्रश्न उपस्थित केला. अल्पसंख्याक समाजाचा काँग्रेस व आघाडीने वापरा व फेका या पध्दतीने वापर केल्याची टीका त्यांनी केली. जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत संभाजीराजेंना पराभूत करणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी राजेंनी शिवसेनेच्या व्यासपीठावर यावे, असे आवाहन केले. कोणत्याही शिवसैनिकाने तडजोड करू नये,अन्यथा आत्ताच बाजूला व्हावे अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना दम भरला. युवासेनेचे अध्यक्ष हर्षल सुर्वे, जि.प.सदस्य बाजीराव पाटील, सरदार मिसाळ, छाया माने आदींची भाषणे झाली.