scorecardresearch

“…पण यावेळी हा योद्धा यशस्वी होऊ शकला नाही”; एनडी पाटील यांच्या अंत्यदर्शनानंतर शरद पवारांची श्रद्धांजली

आपण सार्वजनिक जीवनातील, कष्टकरी, शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जुन्या पिढीतील शिलेदाराला गमावलं आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली

Tribute to Sharad Pawar after ND Patil funeral

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यपक एन.डी. पाटील यांचं निधन झालं आहे. कोल्हापुरात उपचारादरम्यान वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी अस्वस्थता वाटत होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. करोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना करोनाचा संसर्ग देखील झाला होता. पण या वयात देखील त्यांनी करोनावर यशस्वीपणे मात केली होती. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांच्या अनेक प्रश्नांसाठी ते कायम लढत राहिले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोल्हापूर येथे एनडी पाटील यांचे अंत्यदर्शन घेतले आणि आदरांजली वाहिली.

“महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील, कष्टकरी, शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जुन्या पिढीतील शिलेदाराला गमावलं आहे. एनडी पाटील यांचा विचारधारा ही जहाली होती आणि त्या विचारसरणीसाठी त्यांनी आयुष्य झोकून दिलं. त्यांनी व्यक्तीगत सुख, घरदार याचा कधी विचार केला नाही. शैक्षणिक चळवळीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांचा विचार हा त्यांच्या दृष्टीने अंतिम होता. डाव्या विचारसरणीने सामान्य माणसांच्या हिताची जपणूक करण्यासाठी संघर्ष आणि दुसऱ्या बाजून उपेक्षित घटकांच्या शिक्षणसाठी जे दरवाजे खुले केले त्यामध्ये कर्मवीरांचे विचार पुढे नेण्यासाठी त्यांनी आयुष्य घालवले. राजकारणामध्ये आम्ही वेगवेगळ्या दिशेला होतो, ते त्यांच्या विचारधारेशी प्रामाणिक होते,” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

“रयत शिक्षण संस्था बनल्यानंतर मी अध्यक्ष आणि एनडी पाटील चेअरमन होते. त्यामध्ये त्यांनी झोकून देऊन काम केले. त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या, शाहू फुलेंच्या विचाराने जनतेसाठी अखंडपणे काम केले. संघर्षमय जीवनात त्यांनी कधी अपयश घेतले नाही. आरोग्याच्या प्रश्नावरही यापूर्वी त्यांनी दोन ते तीन वेळा मात केली होती. पण यावेळी हा योद्धा वाढत्या वयामुळे यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळे एनडी पाटील आज आपल्यात नाहीत,” असे शरद पवार म्हणाले.

“सामान्य माणसांच्या, कष्टकऱ्यांच्या दृष्टीने एनडी पाटील यांचे जाणे हा फार मोठा आघात आहे. महाराष्ट्रातील नवी पिढी एनडी पाटील यांचा आदर्श नजरेसमोर ठेवेल आणि सामान्यांसाठी त्यांनी जो रस्ता दाखवल्या त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करेल. त्यामध्ये जेवढे यश मिळेल हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल,” असे शरद पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tribute to sharad pawar after nd patil funeral abn

ताज्या बातम्या