ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत देयके एकरकमी त्वरित मिळावी, या मागणीसाठी बुधवारी शेतकरी संघटनेच्या वतीने सहकार मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाला. तथापि पोलिसांनी तो िबदू चौकात अडवून आंदोलकांना अटक केली. त्यांच्या स्वीय सहायकांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. या आठवडय़ात सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा निघालेला हा दुसरा मोर्चा ठरला.
यंदाच्या ऊसगळीत हंगामामध्ये मोठी आíथक समस्या निर्माण झाली आहे. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना चौदा दिवसांत उसाची एफआरपीप्रमाणे देयके देणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. साखर कारखाने साखरेचे दर घसरल्याने ही रक्कम देऊ शकत नाही असे सांगून शासनाने अर्थसाहाय्य करण्याची गरज व्यक्त करीत आहे, तर राज्य शासनाने दोन हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली असली तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आíथक समस्येचा मुकाबला करीत आहेत. शेतकऱ्याची उसाची थकीत देयके मिळावीत या मागणीसाठी चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सहकार तथा पालकमंत्री पाटील यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाला होता. पाठोपाठ आज शेतकरी संघटनेने प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चाचे आयोजन केले होते.
सुरुवातीला मोर्चाला प्रतिसाद अल्प होता. सकाळी ११ वाजता निघणारा मोर्चा दुपारी १ वाजता सुरू झाला. पोलिसांनी रेल्वेस्थानकातच आंदोलकांना अटक करण्याची तयारी केली होती. मात्र मोर्चा शांततेने काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यास परवानगी देण्यात आली. मोर्चा िबदू चौक येथे पोहोचल्यानंतर पोलिसांनी रघुनाथदादा पाटील कार्याध्यक्ष कालिदास अपेट, शिवाजीराव नांदखिले, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पठारे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अॅड. माणिक िशदे, बी. एस. पाटील, गुणाजी शेलार यांच्यासह आंदोलकांना अटक करून नंतर सुटका करण्यात आली. सहकार मंत्र्यांचे स्वीय सहायक राहुल चिकोडे यांना दिलेल्या निवेदनात उसाची देयके त्वरित मिळावीत, नवीन भूसंपादन कायदा रद्द करावा, गोवंशहत्या बंदी कायदा, बलगाडी शर्यतीवरील बंदी रद्द करावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.