जळगावातील जामनेर-भुसावळ रस्त्यावर गारखेडा गावाजवळ ट्रकने जोरदार धडक दिल्याने पॅजो रिक्षातील तीन जण जागीच ठार झाले, तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघात जामनेर- गारखेडादरम्यान सकाळी झाला. लाकडाने भरलेल्या ट्रकने (एमएच २१, ६०४५) प्रवासी घेऊन जात असलेल्या पॅजो रिक्षाला (एमएच १९, एई ९१५८) धडक दिल्याने हा अपघात झाला.

या अपघातात पॅजो रिक्षातील तीन जण जागीच ठार झाले, तर १० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. यातील चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जी. एम. फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात दाखल केले.

घटना कळताच आमदार गिरीश महाजन यांनी धाव घेतली. अपघातातील चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जी. एम. फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की, पॅजो रिक्षा पूर्णपणे चक्काचूर झाली आणि ट्रकही उलटला. ट्रकचालक व क्लीनरलाही दुखापत झाली आहे. अपघातामुळे वाहतूकही विस्कळित झाली होती. पोलिसांनी तत्काळ पोहोचत वाहतूक सुरळीत केली.

जखमी आणि मृतांची नावे खालीलप्रमाणे…

अपघातात तानाजी शंकर साळवी (वय४७, रा. कल्याण), दारासिंग विजयसिंग पाटील (वय ५०, नाशिक) व शेख आवेश शेख अमिनुद्दीन (रा. जामनेर) या तिघांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह विच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. चौघा गंभीर जखमींना जळगावला हलविण्यात आले आहे. इतरांवर जामनेरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विजय अशोक धोटे, पार्वताबाई पालवे, कविता पालवे, अलका पालवे, सागर समाधान दोडके, शेख चाँद शेख नुरा, विष्णू विजय पालवे, मयूर तानाजी पालवे, भाग्यश्री पालवे, शेख रसूल शेख चाँद, अमिनोद्दीन नाजमोद्दीन, मनीष जाधव हे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवा बंद आहे. त्यामुळे नागरिकांना खासगी प्रवासी वाहतुकीशिवाय पर्याय राहिलेला नाही. खासगी वाहनधारकांकडूनही क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरले जात आहेत.

हेही वाचा : Video : भरधाव वेगातील मोटारीने तिघांना चिरडले; ७ वर्षीय मुलाचा मृत्यू, १०० सीसीटीव्ही तपासून आरोपीचा छडा

पॅजो रिक्षातही क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविले जात आहेत. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.