scorecardresearch

औरंगाबादमधील कीर्तनकाराचा महिला कीर्तनकारासोबतचा अश्लील Video झाला Viral; तृप्ती देसाईंनी गृहमंत्र्यांकडे केली तक्रार

“असल्या प्रकरणांमुळे वारकरी संप्रदायाला कुठे तरी गालबोट लागतंय. किर्तनकारांचीही बरीच बदनामी यामधून होतेय.”

Trupti Desai
संग्रहित फोटो

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील कीर्तनकार बाळकृष्ण रामभाऊ मोगल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. मोगल यांचा एका महिला किर्तनकारासोबतचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तृप्ती देसाई यांनी संताप व्यक्त करताना अशा किर्तनकारांवर पोलीस कारवाईबरोबरच वारकरी संप्रदायातील संस्थांनीही कारवाई केली पाहिजे अशी मागणी केलीय. देसाई यांनी यासंदर्भात ईमेलवरुन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडेही या प्रकरणात मोगल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील मागणी केलीय.

“औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील बाळाकृष्ण रामभाऊ मोघल हे प्रसिद्ध किर्तनकार आहेत. त्यांचा एका महिला किर्तनकारासोबतचा शरीरसंबंध ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय,” असं सांगत तृप्ती देसाई यांनी या प्रकरणासंदर्भात थेट गृहमंत्र्यांकडे या प्रकरणाची तक्रार केल्याचंही म्हटलं आहे. “खरं तर दोघांच्या संमतीने चार भिंतींच्या आत केलेली नैसर्गिक क्रियेचा व्हिडीओ चित्रित करुन तो व्हायरल करणं हा कायद्याने गुन्हा आहे, जे किर्तनकार समाजप्रभोधन करतात तेच असे विकृत वागायला लागले तर त्यांच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. म्हणूनच मी आज गृहमंत्र्यांना लेखी तक्रार ईमेलद्वारे केलेली आहे,” असं तृप्ती देसाई म्हणाल्यात.

व्हायरल व्हिडीओ प्रकरणी “मोघल यांच्याविरोधात सायबर गुन्ह्यांअंतर्गत कलम ६६ अ आणि ६७ अ नुसार तसेच आयपीसी कलम २९२ नुसार त्यांच्यावर गुन्हा तातडीने दाखल होणं गरजेचं आहे,” असंही तृप्ती देसाई म्हणाल्यात.

“असल्या प्रकरणांमुळे वारकरी संप्रदायाला कुठे तरी गालबोट लागतंय. किर्तनकारांचीही बरीच बदनामी यामधून होतेय. त्यामुळेच वारकरी महामंडळ आहे, वारकऱ्यांच्या संस्था आहेत त्यांनी सुद्धा या किर्तनकारांवर तातडीने कारवाई करणं गरजेचं आहे. त्यांच्यावर किर्तन करण्याची बंदी घातली पाहिजे. त्यांची ह.भ.प. भागवताचार्य पदवी तातडीने काढून घेतली पाहिजे,” असंही तृप्ती देसाई म्हणाल्यात.

“अशापद्धतीने संदेश बाहेर जाऊ लागले, असे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले तर त्याचा तरुणांवर वाईट परिणाम होईल. तरुणांच्या हाती आज सोशल मीडिया सारखी गोष्ट आहे. त्याचा गैरवापर कसा होतो याचं हे प्रकरण उदाहरण आहे. हे व्हिडीओ थांबले पाहिजे यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. यापुढे असे व्हिडीओ चित्रित करणं अशाप्रकारे ते व्हायरल करण्यांवर कारवाई झाली तर यापुढे किर्तनकार किंवा इतर कोणीही अशाप्रकारचे कृत्य करायची हिंमत करणार नाही,” असं तृप्ती देसाईंनी म्हटलंय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-04-2022 at 14:24 IST

संबंधित बातम्या