अशोक खरातला पोलिसांनी लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी कायदेशीर कारवाईचं आश्वासन दिलं आहे. तसंच सरकारसाठी महिलांची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान तृप्ती देसाई यांनी अशोक खरातच्या एन्काऊंटरची भीती व्यक्त केली आहे.

तृप्ती देसाई नेमकं काय म्हणाल्या?

आयजीच जर अशोक खरातला गुरु मानत आहेत तर ते गुरुवर कारवाई कशी करणार? त्यामुळेच हे प्रकरण मागच्या वर्षी उघड होऊ शकलं नाही. पोलिसांचा दबाव वाढला होता. आयजी दत्तात्रय कराळेंनी वारंवार पाठिेशी घातलं त्यामुळे अशोक खरातची हिंमत वाढत गेली आणि त्याने अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं. आयजी कराळे यांचीही चूक आहे असं सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी म्हटलं आहे.

रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातला पाठिशी घातलं-तृप्ती देसाई

रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. त्यांनी लैंगिक शोषण करणाऱ्या व्यक्तीला पाठिशी घातलं. याला त्याच जबाबदार आहेत. पत्रकारावर दबाव आणणं, नोटिसा पाठवणं. पीडितेसाठी चाकणकरांनी कुठलाही फोन केला नाही. रुपाली चाकणकर यांनाही या प्रकरणात सहआरोपी केलं पाहिजे. रुपाली चाकणकरच नाही जे जे दोषी आहेत त्यांचा तपास करावा. जर चाकणकर दोषी असतील तर त्यांना सहआरोपी केलं पाहिजे. चाकणकर यांना अशोक खरात महिलांचं लैंगिक शोषण करतो हे मागच्या वर्षीच माहीत होतं. हे प्रकरण दाबण्यासाठी त्यांनीच दबाव आणला होता. त्यामुळे रुपाली चाकणकर साफ खोटं बोलत आहेत की अशोक खरातबाबत मला माहीत नव्हतं. अशोक खरात यांना चाकणकर गुरु मानत होत्या, त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे.

अशोक खरातचा एन्काऊंटर होऊ शकतो-तृप्ती देसाई

अनेक बडे नेते अशोक खरातच्या संपर्कात होते, आर्थिक देवाण-घेवाण होत होती. आमदार, खासदार, आयएस अधिकारी वगैरे सगळ्यांचे संबंध होते. २४ तारखेला अशोक खरातची पोलीस कस्टडी संपणार आहे. त्यावेळी या नेत्यांची नावं पुढे येऊ नयेत म्हणून एकच मार्ग राहतो. तो म्हणजे अशोक खरातला संपवण्याचा. अशोक खरातचा एन्काऊंटर होऊ शकतो, त्यामुळेच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केलं आहे ही डाव त्यांनी उधळून लावा. हे रॅकेट उद्ध्वस्त करण्याची आवश्यकता आहे. जे कुणी अधिकारी, नेते आहेत त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे अशीही माझी मागणी आहे. अशोक खरातला कायद्याने शिक्षा झाली पाहिजे असंही तृप्ती देसाईंनी म्हटलं आहे. टीव्ही ९ मराठीशी तृप्ती देसाईंनी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही अशोक खरातच्या एन्काऊंटरची भीती व्यक्त केली आहे.

मार्च २०२५ ला प्रकरण समोर आलं होतं पण..

मार्च २०२५ मध्ये जेव्हा श्रीरामपूरच्या दैनिकात बातमी आली तेव्हा मला फोन आला होता. कॅप्टन नावाने ओळखला जाणारा अशोक खरात आहे त्याचे व्हिडीओ आमच्याकडे येणार आहेत असं मला सांगितलं होतं. नंतर आयोगाच्या अध्यक्षांनी दबाव आणला. जे लोक पेन ड्राईव्ह देणार होते त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. त्यामुळे तो लोक पेन ड्राइव्ह द्यायला टाळाटाळ करत होते. तो पेन ड्राईव्ह ५ मार्च २०२६ ला आमच्याकडे काही लोक घेऊन आले. अशोक खरात परदेशात पळून जाणार होता. त्यामुळे मी त्या लोकांना पोलिसांशी जोडून दिलं आणि पुढे कारवाई झाली असं तृप्ती देसाई म्हणाल्या.