लाच स्वीकारण्याच्या प्रकरणामध्ये अटक होऊन जामिनावर सुटल्यानंतर महापौर तृप्ती माळवी यांनी महापौरपदाचा राजीनामा देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत आला असून महापालिकेची सत्ता समीकरणे बिघडण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी मात्र पूर्वी ठरल्याप्रमाणे तृप्ती माळवी यांना महापौरपदाचा राजीनामा द्यावा लागेल, त्याबाबत नाइलाज आहे, असे मत व्यक्त केले आहे. यामुळे महापौर राजीनामा प्रकरण कसे वळण घेते याकडे लक्ष वेधले आहे.
जागेच्या आरक्षणामध्ये फेरफार करण्यासाठी १६ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याबद्दल महापौर तृप्ती माळवी व त्यांचा स्वीय सहायक यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणात अटक होऊ नये यासाठी माळवी यांचे गेले चारपाच दिवस वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू होते. सर्व प्रयत्न खुंटल्यानंतर अखेर गुरुवारी त्या स्वतहून लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे हजर झाल्या. दुपारी न्यायालयाच्या आदेशानुसार माळवी यांना अटक करण्यात आली नंतर वैयक्तिक जामिनावर मुक्तताही करण्यात आली.
या वेळी पत्रकारांशी बोलताना माळवी म्हणाल्या, लाच स्वीकारण्याच्या प्रकरणामध्ये आपल्याला जाणीवपूर्वक गोवले आहे. या प्रकरणाशी आपला कसलाही संबंध नसून यामागील बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे. महापौरपदाच्या राजीनाम्याबद्दल बोलताना त्यांनी आपण पदाचा राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या विधानाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र गोंधळ उडाला आहे. माळवी यांचा राजीनामा कसा घ्यायचा याची चिंता पक्षाला लागली आहे. माळवी यांनी महापौरपदाचा राजीनामा शहर अध्यक्ष आर.के.पवार यांच्याकडे दिला आहे. मात्र महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये राजीनामा सादर झाला, तर तो ग्राह्य मानला जातो. येत्या सभेत माळवी राजीनामा देणार होत्या पण आता त्यांनी पवित्रा बदलल्याने राजीनामा कसा घ्यायचा व हा गोंधळ कसा निस्तारायचा याचा पेच पक्षासमोर निर्माण झाला आहे.