शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांचं निधन

मागील तीन दिवसांपासून प्रकृती चिंताजनक होती.

श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांचे आज(बुधवार) दुपारी ५ वाजता निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी वृद्धापकाळाने शेगाव येथे त्यांची प्राणज्योत मालवली. तर, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शेगावमध्ये भाविकांनी गर्दी करू नये, असं आवाहन संस्थानच्यावतीने करण्यात आलेलं आहे.

मागील तीन दिवसांपासून मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे शिवशंकर भाऊ पाटील यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. मात्र, त्यांनी ‘मला कुठल्याही दवाखान्यात हलवू नका’ असं सांगितलं होतं.  त्यांच्यावर घरीच डॉ. हरीश सराफ यांच्या देखरेखीखाली उपाचार सुरू होते.

शिवशंकरभाऊ सुखदेव पाटील यांचा जन्म १२ जानेवारी १९४० रोजी झाला. ३१ ऑगस्ट १९६२ पासून शिवशंकरभाऊ पाटील यांनी संत श्री गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त पद सांभाळले. १९६९ ते १९९० पर्यंत सलग २० वर्षे ते संस्थानचे अध्यक्ष होते. शिवशंकरभाऊ पाटील सध्या व्यवस्थापकीय विश्वस्त म्हणून कार्यरत होते. शेगाव नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून १९७४ ते १९७९ पर्यंत त्यांनी कार्य केले. शेगाव नगरीच्या विकासासाठी सदैव त्यांची आग्रही भूमिका राहिली आहे. श्री गजानन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिवशंकरभाऊ पाटील यांनी शेगाव येथे संत श्री गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्याालयाची स्थापन केली. श्री गजानन शिक्षण संस्थेचे शिवशंकरभाऊ पाटील अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झालेले असतांना त्यांनी विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण उपलब्ध करून दिले. कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांनी श्री गजानन महाराज संस्थानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यांनी अध्यात्मिक व सामाजिक कार्याची सांगड घालून नवा आदर्श समाजासमोर निर्माण केला. त्यांच्या जाण्याने एक तपस्वी, अध्यात्मिक क्षेत्रातील दीपस्तंभ हरपल्याची शोकसंवेदना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली आहे.

तर, शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनामुळे सर्वच स्तरातून दुःख व्यक्त केलं जात आहे.  केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटद्वारे शोक व्यक्त केला आहे.

एक व्रतस्थ कर्मयोगी म्हणून शिवशंकर भाऊ कायम स्मरणात राहतील – गडकरी

“श्री संत गजानन महाराज शेगांव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. शिवशंकर भाऊ यांनी समर्पित वृत्तीने व प्रामाणिकपणे श्री गजानन महाराजांच्या विचारांचा वारसा जोपासला. संस्थानचे पावित्र्य राखण्याबरोबरच संस्थानाला सामाजिक कार्याची जोड देत त्यांनी सर्वार्थाने सामाजिक व धार्मिक कार्यात आदर्श निर्माण केला. एक व्रतस्थ कर्मयोगी म्हणून शिवशंकर भाऊ कायम स्मरणात राहतील. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. ॐ शांती.” अशा शब्दांमध्ये केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शोक व्यक्त केला आहे.

एक व्रतस्थ सेवेकरी, मॅनेजमेंट गुरू, निष्काम कर्मयोगी आपण गमावला – फडणवीस

राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. “श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगावचे प्रमुख शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक व्रतस्थ सेवेकरी, मॅनेजमेंट गुरू, निष्काम कर्मयोगी आपण गमावला आहे. शिवशंकर भाऊ हे समर्पण भावाचे मूर्तिमंत होते. शेगावला जायचो तेव्हा अनेकदा त्यांची भेट व्हायची. प्रत्येकवेळी आपुलकीने विचारपूस करायचे, शेगाव संस्थानचे प्रश्न सोडवून घ्यायचे. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्याला हातभार लावण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य होते. महाजनादेश यात्रेप्रसंगी सुद्धा शेगावला दर्शनाला गेलो, तेव्हा त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा झाल्या होत्या. त्यांच्या निधनाने मी व्यक्तिगत मार्गदर्शकाला मुकलो आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

ऋषितुल्य व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड  – अशोक चव्हाण

तर, “शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनामुळे आयुष्यभर निस्वार्थपणे संत गजानन महाराजांची सेवा करणारे ऋषितुल्य व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. संस्थानच्या सेवाभावी कार्याच्या विस्तारामध्ये त्यांची भूमिका नेहमी स्मरणात राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.” अशा शब्दांमध्ये राज्याचे  सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दुःख व्यक्त केलं आहे.

शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर पाटील यांच्या निधनामुळे आयुष्यभर निस्वार्थपणे संत गजानन महाराजांची सेवा करणारे ऋषितुल्य व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. संस्थानच्या सेवाभावी कार्याच्या विस्तारामध्ये त्यांची भूमिका नेहमी स्मरणात राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/akRu6TLB64

— Ashok Chavan (@AshokChavanINC) August 4, 2021

व्यवस्थापन कौशल्यामुळे मॅनेजमेंट गुरु म्हणून ओळखले जात असत – सुप्रिया सुळे

याचबरोबर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना देखील शोक व्यक्त केला आहे.  “श्री गजानन महाराज मंदिर, शेगाव (बुलढाणा) मंदिराचे विश्वस्त श्री शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन झाले. ही बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांनी या देवस्थानाच्या माध्यमातून शिक्षण व वैद्यकीय सुविधांसह अनेक समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे सुरु केले. शिवशंकरभाऊ व्यवस्थापनाच्या कौशल्यामुळे मॅनेजमेंट गुरु म्हणून ओळखले जात असत. शेगाव येथे गेल्यावर त्यांची हमखास भेट होत असे. त्यांची भेट प्रेरणादायी असे. शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.” अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

तसेच, “त्यांचा या परिसरातील नागरिकांना फायदा झाला होता. मंदिराच्या माध्यमातून सुरु केलेला अन्नछत्र हा उपक्रम त्यांच्या कुशल व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण होते. याशिवाय त्यांच्या पुढाकाराने केल्या जाणाऱ्या मंदिराच्या एकंदर व्यवस्थापनाची हॉवर्ड या जागतिक दर्जाच्या विद्यापीठाने नोंद घेतली होती.” अशी देखील माहिती सुप्रिया सुळे यांनी सांगितली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Trustee of shegaon sansthan shivshankar bhau patil passed away msr

ताज्या बातम्या