जंगलातील झाडे तोडून जमीन बळकावण्याचा प्रयत्न

चुरचुरा चक व चुरचुरा माल या गावालगतच्या जंगल परिसरात आरोपींनी संगनमताने स्वत:च्या शेतातील सव्‍‌र्हे क्र. १८, १९ मधील झुडुपे तोडून जमीन शेतीयोग्य करण्याची परवानगी पोर्ला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना मागितली.

गडचिरोली जि.प. महिला कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, एकाला जामीन, तिघे फरार

गडचिरोली : गडचिरोलीपासून जवळच असलेल्या चुरचुरा या गावातील जंगलालगत सात एकर शेती विकत घेऊन त्या लगतचे जंगल व स्मशानभूमीवरील ५०० पेक्षा अधिक मोठी झाडे अवैध पद्धतीने तोडून जवळजवळ ३० हेक्टर शेतजमीन तयार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गडचिरोली जिल्हा परिषदेतील महिला कर्मचारी गायत्री गौतम फुलझेले ऊर्फ गायत्री काशीनाथ सोनकुसरे, त्यांची दोन मुले प्रांजल व प्रणय फुलझेले आणि नीळकंठ सिडाम यांच्यावर महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियमाद्वारे वनगुन्हे दाखल करण्यात आले आहे.

चुरचुरा चक व चुरचुरा माल या गावालगतच्या जंगल परिसरात आरोपींनी संगनमताने स्वत:च्या शेतातील सव्‍‌र्हे क्र. १८, १९ मधील झुडुपे तोडून जमीन शेतीयोग्य करण्याची परवानगी पोर्ला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना मागितली. परवानगी मिळाल्यानंतर मात्र स्वत:चे शेत सोडून लगतचे कक्ष क्र. ५४ मधील जंगल, महसूल विभागाची सव्‍‌र्हे नं. २० मधील काबील कास्त जमीन व चुरचुरा माल या गावाच्या स्मशानभूमीची जागा यावर जेसीबी, पोकलेन व डिझेलचे आरामशीन यांच्या सहाय्याने जवळजवळ ८ दिवस या परिसरातील झाडांची मोठय़ा प्रमाणावर कत्तल केली. कापलेली लाकडे तिथेच जमिनीत पुरून ठेवली. गावकऱ्यांना आणि संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या ही बाब लक्षात आल्यानंतर वनसमितीच्या पदाधिकाऱ्यांनी अवैध जंगलतोड होत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ९ ऑगस्टला घटनास्थळावर जाऊन कापलेल्या झाडांचा जप्ती पंचनामा करून गायत्री गौतम, मुले प्रांजल व प्रणय फुलझेले आणि नीळकंठ सिडाम या चार आरोपींविरुद्ध वनगुन्हा दाखल केला आहे. नीळकंठ सिडाम यास अटक करून न्यायालयात हजर केले असता, जामिनावर त्यांची सुटका झाली आहे. तर, तिघेजण फरार आहेत. गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी सुद्धा गुन्हय़ाचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळाला भेट दिली आणि कठोर कारवाईचे निर्देश दिले आहे. वन गुन्हय़ातील फरार असलेल्या आरोपी गडचिरोली जिल्हा परिषदेत कर्मचारी असल्यामुळे वनपरिक्षेत्राधिकारी यांनी जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना पत्र देऊन त्यांना चौकशीसाठी उपस्थित होण्याचे निर्देश देण्याची विनंती केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Trying to grab land by cutting down trees in the forest ssh