तानाजी काळे, लोकसत्ता

इंदापूर : संतशिरोमणी तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा विसावा असल्याने इंदापूरमध्ये रविवारी पंढरपूर अवतरले होते. भाविकांच्या गर्दीने सर्व रस्ते फुलून गेले होते. पालखीचे दर्शन घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत रांगा लागल्या होत्या.

पालखीचा मुक्काम सलग दोन दिवस इंदापूर शहरात असल्याने इंदापूरकरांना वैष्णवांची, पालखी रथाच्या बैलांची आणि अश्वांची सेवा करण्याची संधी मिळाली. शहरातील प्रशासकीय इमारतीच्या भव्य प्रांगणात मोठमोठे पाळणे आणि मिठाईवाल्यांनी आपली दुकाने थाटली होती. श्री नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी इंदापूर शहरासह आसपासच्या गावखेड्यातील नागरिकांनी गर्दी केली होती. चौकाचौकात भव्य स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. अन्नदान, अल्पोपार, औषधोपचार, चरण सेवा, चहा, बिस्कीट वाटप करून इंदापूरकर वैष्णवांची सेवा करताना दिसत होते.

दोन वर्षांच्या खंडानंतर पालखी सोहळा इंदापुरात दोन दिवसांच्या मुक्कामाला आल्याने इंदापूरकराच्या आनंदाला पारावर उरला नाही.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूरचे प्रभारी पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

पालखी सोहळ्यासमवेत असलेले सोहळा प्रमुख आणि विश्वस्तांच्या भोजनाची सेवा गेली ६० वर्षे गोकुळदास शहा, मुकुंद शहा आणि भरत शहा यांचे कुटुंब अव्याहतपणे करीत आहे. वारकरी संप्रदायाला शोभेल असे सुशोभीकरण अंकिता शहा यांच्या प्रयत्नाने झाल्याने यावर्षी पालखी सोहळ्याला शहरातील सुशोभीकरणाने वेगळाच भक्तिरंग भरला.