अलिबाग- तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध विभागाचा कार्यभार स्विकारल्यानंतर रायगड जिल्ह्यात भेसळखोरांवर व्यापक कारवाईला सुरुवात झाली आहे. अन्न औषध प्रशासन भेसळखोरांवर आणि प्रतिबंधीत वस्तूंची विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. विभागाने केलेल्या ८७ लाख ५८ हजार रुपयांचा प्रतिबंधात्मक अन्न पदार्थ जप्त केले आहेत. तर १९ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सण उत्सवाच्या काळात भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री वाढते. दुध, दुग्धजन्य पदार्थ, खवा, पनीर यांची मोठ्या प्रमाणात भेसळ होत असते. हीबाब लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासन विभागाने भेसळखोरांविरोधात व्यापक कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.

रायगड जिल्ह्यात ३१० अन्न नमुन्याची तपासणी करण्यात आली होती. १०७ नमुने प्रमाणित करण्यात आले असून अप्रमाणित ४ आणि असुरक्षित ४ असे ८ नमुने आढळले असून त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. अन्न पदार्थाबाबत ६१८ ठिकाणी तपासणी केली असता १२९ जणांना सुधारणा नोटीस देण्यात आलेली आहे. ८ जणांचे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत. प्रतिबंधित गुटखा, पान मसाला प्रकरणी ३९ कारवाया केल्या असून ८९ लाख ५८ हजार १४५ रुपयाचा माल जप्त करण्यात आलेला आहे.

दूध व दुग्ध जन्य पदार्थ प्रकरणी २ कारवाया केल्या आहेत . त्यात १६९६ लिटर दूध व दुग्धजन्य पदार्थ भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून व विनापरवाना विक्री करीत असल्यामुळे ८४ हजार रुपयांचा माल जप्त करून नष्ट केले आहे. ११३ प्रकरणात दंडात्मक कारवाई करून ९ लाख ४७ हजाराचा दंड शासनजमा करण्यात आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात भेसळ करणारे गुटखा, पान मसाला विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्ह्यात ९ लाख ४७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थ कारवाईत ८७ लाख ५८ हजार १४५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. १९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. सणासुदीच्या दिवसात भेसळ करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाणार आहे असा इशाराही अन्न व औषध विभागाने दिला आहे.

रायगड जिल्ह्यात अन्न भेसळ करणारे, प्रतिबंधित अन्न पदार्थ बाळगणारे, यांची तपासणी मोहीम अन्न व औषध विभागाने सुरू केली आहे. अन्नात भेसळ करुन ग्राहकांना विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. असे असतानाही काहीजण भेसळ युक्त पदार्थ विक्री करीत आहेत. सण काळात हे प्रकार अधिक वाढत असतात. भेसळ युक्त अन्न पदार्थ खाल्याने विषबाधा होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे भेसळ करणाऱ्यावर अन्न व औषध विभागाची करडी नजर असते. त्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम विभागातर्फे सुरू आहे.

मिठाई विक्रेत्यांवर विभागाची नजर

गणेशोत्सव सण हा आठवड्यावर आला आहे. गणेशोत्सव काळात भक्तगण मिठाई मोठ्या प्रमाणात खरेदी करीत असतात. अशावेळी भेसळ युक्त मिठाई विक्रीस ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गणेशोत्सव काळात भेसळ करणाऱ्यावर कारवाई करण्याची मोहीम तीव्र केली जाणार आहे.

सणासुदीच्या दिवसात मिठाई, मावा, उत्पादक करणाऱ्या आस्थापनाची तपासणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर हॉटेल , रेस्टॉरंट बाबत तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. भेसळ करणाऱ्या विरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. जनतेने ही भेसळ होत असले तर कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार करा नोंदवावी. मिलिंद महांगडे, सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन- रायगड</strong>