Tukaram Mundhe FDA News: अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे तुकाराम मुंढे यांनी हाती घेतल्यापासून राज्यभरात मोठ्या कारवायांचा धडाका सुरू आहे. अन्नपदार्थांत भेसळ करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेला आहे. तुकाराम मुंढे यांच्या विभागाने सुरू केलेल्या कारवायानंतर भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.
अन्नपदार्थांच्या सुरक्षेबाबत बोलताना तुकाराम मुंढे यांनी आता नागरिकांना महत्वाचं आवाहन केलं आहे. अन्नपदार्थांची सुरक्षा ही आस्थापनाच्या आकारावर ठरत नाही, तसेच पंचतारांकित हॉटेल असो किंवा रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेता, सर्वांसाठी नियम सारखे आहेत. त्यामुळे नियमांचं पालन केलंच पाहिजे आणि ग्राहकांनीही फक्त चविष्ट नाही तर सुरक्षित अन्नाची मागणी केली पाहिजे, असं आवाहन तुकाराम मुंढे यांनी एएनआयशी बोलताना केलं आहे.
तुकाराम मुंढे काय म्हणाले?
“आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की २०११ च्या पूर्वी आपण अन्नपदार्थांतील भेसळ रोखण्यावर जास्त भर देत होतो. कोणत्याही अन्नपदार्थांत भेसळ झाली नाही पाहिजे. पण फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) हा कायदा २००६ मध्ये करण्यात आला. त्यानंतर हा कायदा २०११ मध्ये लागू करण्यात आला. त्यामुळे हा कायदा लागू झाल्यानंतर अन्नपदार्थांतील गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणात बदल झाला. आता हेच बदल अन्न क्षेत्रातील व्यावसायिक, नियामक संस्था आणि ग्राहक यांच्या कार्यपद्धतीत आणि दृष्टिकोनात होणं गरजेचं आहे”, असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे.
“खाद्यपदार्थ व्यावसायिक असो किंवा पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि खाद्यपदार्थ बनवणारे असो किंवा ग्राहक, या तिन्ही स्थरावर आपल्याला अन्नाच्या सुरक्षिततेच्या नियमांचं पालन करणं गरजेचंच आहे. तसेच नियामक संस्थांनी देखील अन्नपदार्थांतील गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित केली पाहिजे”, असं तुकाराम मुंढे म्हणाले.
“खरं तर अन्नसुरक्षेचा संबंध हा फक्त एखाद्या हॉटेलच्या किंवा एखाद्या आस्थापनेच्या आकाराशी नसतो. मग ते एखादे पंचतारांकित हॉटेल असो किंवा रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेता. नियम सर्वांसाठी समान असतात, नियमांचं पालन करणं ही सर्वांची जबाबदारी असते. मग हे नियम पाळले जातात की नाही? याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि ती जबाबदारी आम्ही पार पाडण्याचं काम करत आहोत”, असंही तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.
‘फक्त चविष्ट नव्हे, तर सुरक्षित अन्नाची मागणी करा’
“ग्राहकांना आणि आपल्या सर्वांनाच हे एकदा ठरवावं लागेल की आपण जे खात आहोत ते ग्राहकांनी देखील फक्त चविष्ट अन्नाची मागणी करण्याऐवजी ते सुरक्षित आहे का? म्हणजे फक्त चविष्ट नाही, तर सुरक्षित अन्नाची मागणी करण्याकडे वळलं पाहिजे. जर ही संस्कृती विकसित केली तर निरोगी भारत घडवण्यास मोठी मदत होईल”, असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे.
