Tukaram Mundhe FDA Notice to Bollywood Actors: ‘विमल इलायची’च्या सरोगेट जाहिरातप्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना अन्न व औषध प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. आता या प्रकरणावर भाष्य करताना अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, “तुमच्या दृष्टीने ते सुपरस्टार असतील; परंतु माझ्यासाठी ते केवळ जाहिरातदार आणि कायद्याचे उल्लंघन करणारे लोक आहेत. त्यामुळे कायद्यानुसारच कारवाईची प्रक्रिया पुढे जाईल.” ‘एनडीटीव्ही’ वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सरोगेट जाहिराती करणाऱ्या अभिनेत्यांविरोधात स्पष्ट भूमिका मांडली.

नोटीस बजावलेल्या तीन अभिनेत्यांपैकी एकाने अद्याप खुलासा सादर केलेला नसून, त्याच्याविरुद्ध खटला चालवण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचेही मुंढे यांनी स्पष्ट केले.

नेमके प्रकरण काय?

महाराष्ट्रात गुटखा आणि पानमसाला विक्रीवर पूर्णतः बंदी आहे. असे असताना ‘विमल इलायची’च्या नावाखाली बंदी असलेल्या ‘विमल पान मसाला’ची छुप्या पद्धतीने जाहिरात केली जात असल्याचा ठपका ठेवत एफडीएच्या मुंबई विभागाने ११ ऑगस्ट रोजी या तीनही अभिनेत्यांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यांना खुलाशासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती.

एका अभिनेत्याविरुद्ध खटल्याची तयारी

कारवाईबाबत माहिती देताना मुंढे म्हणाले, “आम्ही कायद्यानुसार ही पावले उचलली आहेत. तिघांपैकी दोघांनी नोटिशीला उत्तर दिले असून, एकाने अद्याप उत्तर पाठवलेले नाही. ज्यांनी उत्तर दिले नाही त्यांच्यावर आम्ही थेट खटला दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करत आहोत.” यावेळी त्यांनी मुलाखतीत कुणाचीही नावे घेतली नाहीत.

उत्तर देणाऱ्या दोन्ही अभिनेत्यांनी ‘याची जबाबदारी जाहिरातदाराची नसून उत्पादन तयार करणाऱ्या कंपनीची आहे’, असा पवित्रा घेतला आहे. यावर संबंधित अधिकाऱ्यांसमोर त्यांची सुनावणी घेतली जाईल, असे मुंढे यांनी सांगितले. नेमके कोणी उत्तर दिले नाही, याबाबत विचारले असता त्यांनी स्पष्ट केले की, कागदपत्रे सहाय्यक आयुक्तांकडे असल्याने आता नाव सांगता येणार नाही.

जाहिरातदाराला जबाबदारी झटकता येणार नाही

उत्पादकाची जबाबदारी असल्याचे सांगत सेलिब्रिटींना अंग काढून घेता येणार नाही, असा टोलाही मुंढे यांनी लगावला. “अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत (FSSAI) जाहिरातींसंबंधी स्पष्ट नियमावली आहे. जाहिरात करणाऱ्या व्यक्तीवर अथवा संस्थेवर कोणती जबाबदारी आहे, हे ‘अन्न सुरक्षा आणि मानके (जाहिरात आणि दावे) नियम, २०१८’ मध्ये नमूद करण्यात आले आहे. आपण कशाची जाहिरात करत आहोत, याची योग्य ती पडताळणी करण्याची कायदेशीर जबाबदारी संबंधित अभिनेत्यांची आहे. त्यामुळे केवळ नैतिकच नव्हे, तर कायदेशीरदृष्ट्याही ते जबाबदारीतून सुटू शकत नाहीत”, असे मुंढे यांनी स्पष्ट केले.

दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

दुसरीकडे तीनही अभिनेत्यांना बजावलेल्या नोटिसा रद्द करण्यासाठी ‘विमल इलायची’ची मुख्य परवानाधारक कंपनी ‘पीबी ॲग्रो एलएलपी’ने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र १४ सप्टेंबर रोजी न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी ही याचिका फेटाळून लावली. या नोटिसा मुंबई एफडीएने जारी केल्या असल्याने हे प्रकरण दिल्ली न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात येत नाही; याचिकाकर्त्यांनी महाराष्ट्रातील न्यायालयात दाद मागावी, असे निर्देश न्यायालयाने दिले.

रुग्णालयाच्या नफेखोरीवरही बोट

याच मुलाखतीत तुकाराम मुंढे यांनी खासगी रुग्णालयांत वापरल्या जाणाऱ्या वैद्यकीय साहित्यावरील अवाजवी नफेखोरीवरही ताशेरे ओढले. “रुग्णालयांत वापरल्या जाणाऱ्या अनेक साहित्यांवर १५० ते तब्बल २,८०० टक्क्यांपर्यंत वाढीव किंमत लावली जाते. अवघ्या ११ रुपयांना खरेदी केलेला आयव्ही सेट रुग्णांना चक्क ३२५ रुपयांच्या छापील किमतीत विकला जात असल्याचे समोर आले आहे,” असे सांगत या प्रकरणी केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणा’ला पत्र लिहून चौकशीची मागणी केल्याची माहिती मुंढे यांनी दिली.

ग्राहकांची ही लूट थांबवण्यासाठी या साहित्याचा समावेश ‘औषध किंमत नियंत्रण आदेशा’त करून पारदर्शकता आणण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.