नवी मुंबईत अन्नपदार्थांच्या पाकिटांवरील मुदत संपल्याची तारीख बदलण्याचं मोठं रॅकेट उघडकीस आलं. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये मॅगी आणि लेज यांसारख्या नामांकित ब्रँड्सचा साठा जप्त करण्यात आला. या सगळ्यानंतर आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एक महत्त्वाची पोस्ट केली आहे.

काय आहे तुकाराम मुंढेंची पोस्ट?

जेव्हा एखाद्या पाकिटावरचं लेबल खोटं बोलतं तेव्हा ग्राहकाला त्याची किंमत मोजावी लागते. एक्स्पायरी डेट ही फक्त एखाद्या पॅकिंगवरची शाई नाही. पदार्थाच्या घटकांची पाकिटावरची माहिती ही फक्त माहिती नाही तर ग्राहकाला दिलेली वचनं आहेत. जेव्हा अशी वचनं जाणूनबुजून बदलली जातात तेव्हा तो फक्त नियमाचा भंग ठरत नाही तर तो ग्राहकांसह केलेला विश्वासघात ठरतो. आम्हाला कुठल्याही व्यवसायात भीती किंवा दहशत पसरवायची आहे म्हणून आम्ही नियमावली तयार करत नाही. नियमावली अशासाठी असते की नागरिकांना जे अन्न पदार्थ आणि औषधं विकली जातात ती योग्य आहेत की नाही? त्यातले घटक पदार्थ बरोबर आहेत की नाही. जी वचनं दिली आहेत ती प्रामाणिकपणे पाळली गेली आहेत की नाही? या सगळ्यांसाठी नियमावली असते. ग्राहक आणि व्यापारी यांच्यातलं पोषक आणि पारदर्शक वातावरण निर्माण करण्यासाठी नियमावली असते असं म्हणत तुकाराम मुंढेंनी पोस्ट शेअर केली आहे.

२४ ते २९ ऑगस्ट दरम्यान FDA ची कारवाई

FDA ने नवी मुंबईतून जो साठा जप्त केला त्यात लेज, कुरकुरेचे विविध प्रकार, फन फ्लिप्स यांसारखे बटाट्याचे वेफर्स, मॅगी मसाला आणि आटा नुडल्सचा समावेश आहे. तसंच रेडी टू इट आणि रेडी टू कूक पदार्थही जप्त करण्यात आले आहेत. २४ ते २९ ऑगस्ट या दरम्यान ही कारवाई एफडीएने केली होती.तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांना आढळलं की, अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगवर छापलेली उत्पादन तारीख आणि मुदत संपल्याची तारीख पुसून त्या जागी नवीन तारखा टाकल्या जात होत्या. तसंच, पदार्थांचे घटक आणि पौष्टिक मूल्यांची माहिती देणारी मूळ लेबल्स काढून त्या जागी नवीन स्टिकर्स लावले जात होते. हा सर्व साठा पुन्हा नव्याने पॅक केला जात असल्याचं विभागाने सांगितलं होतं. याच प्रकारावर संताप व्यक्त करत तुकाराम मुंढे यांनी पोस्ट लिहिली आहे. जी चांगलीच चर्चेत आली आहे.