Tukaram Mundhe bribe statement reaction : महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लाच घेण्याच्या शक्यतेवर भाष्य करताना, “मला लाच देण्याची कुणाची हिंमत होईल, असं मला वाटत नाही. कुणी तसा विचार करत असेल, तर त्याने १०० वेळा विचार करावा”, असा इशाराल त्यांनी दिला आहे.
महाराष्ट्रात अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य व्यवसायांवर सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर NDTV Profit ला दिलेल्या राऊंडटेबल मुलाखतीत त्यांना लाच देण्याचा कुणी प्रयत्न केला आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तुकाराम मुंढे म्हणाले, “मला वाटत नाही की माझ्यासोबत असं करण्याची कुणाची हिंमत होईल. कुणी तसा विचार करत असेल, तर त्याने १०० वेळा विचार केलेला बरा.”
तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या मोहिमेला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य व्यवसायांवर कठोर कारवाई केल्यामुळे ते चर्चेत आले आहेत.
‘अहंकारी नाही, स्पष्टवक्ता आहे’
तुकाराम मुंढे यांच्या कठोर कार्यपद्धतीबाबत विचारलं असता, “अहंकारी किंवा इतरांचं न ऐकणारा अधिकारी अशी टीका आपल्यावर अनेकदा केली जाते, हे त्यांनी मान्य केले. “अनेक लोक मला अहंकारी म्हणतात. मी अहंकारी आहे म्हणून नव्हे, तर मी स्पष्टवक्ता आहे म्हणून. स्पष्टवक्तेपणा आणि अहंकार यांच्यात खूपच बारीक रेषा आहे”, असं ते म्हणाले. आपल्या भूमिकेबाबत प्रामाणिक आणि पारदर्शक राहणे, हीच आपली कार्यपद्धती असल्याचं मुंढे यांनी स्पष्ट केलं.
“आपल्याकडून काय अपेक्षित आहे आणि आपण काय केलं, याबाबत आपण प्रामाणिक आणि पारदर्शक आहोत का? आपले प्रयत्न यशस्वी झाले तर त्यासारखं दुसरं काही नाही. आणि यश आलं नाही तरी निदान आपण प्रयत्न तरी केला, याचं समाधान असतं”, असं त्यांनी सांगितलं.
‘मी काही असामान्य काम केलेलं नाही’
अनेक जण आपल्याला प्रेरणादायी व्यक्ती मानतात, याबाबतही तुकाराम मुंढे यांनी नम्र प्रतिक्रिया दिली. “मला वाटत नाही की हे खरंच प्रेरणादायी आहे किंवा मी काही असामान्य काम केलं आहे. माझ्या भूमिकेकडून जी अपेक्षा आहे, ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करत आहे. त्यापेक्षा कमी नाही आणि त्यापेक्षा जास्तही नाही”, असं त्यांनी सांगितलं. “आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या भूमिकेकडून अपेक्षित असलेली जबाबदारी पार पाडली, तर मला वाटतं आपण एक अतिशय उत्तम समाज घडवू शकतो,” असंही ते म्हणाले.
राजकारणात जाणार का?
तुकाराम मुंढे यांनी राजकारणात प्रवेश करण्याच्या चर्चांवरही भाष्य केलं. आपला स्पष्टवक्तेपणा आणि ताठर भूमिका पाहता आपण राजकारणासाठी योग्य व्यक्ती नसल्याचे त्यांनी सूचित केलं. “माझ्यासारखी व्यक्ती, जी अतिशय स्पष्टवक्ती आणि तत्त्वनिष्ठ आहे, मला वाटत नाही की अशी व्यक्ती राजकारणात स्वीकारली जाईल”, असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं.
