मुंबई : अंपग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये पाचपट वाढ करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. शिष्यवृत्तीच्या रकमेत भरघोस वाढ करण्यात आली असून शिशुवर्ग ते बारावीपर्यंतच्या राज्यातील ९२ हजार ५८१ अंपग विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना ८ ते ३४ वर्षे जुन्या आहेत. या योजनांमध्ये कालानुरूप बदल करणे आवश्यक असल्याने तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मध्ये अपंगांना सामान्य व्यक्तीपेक्षा अधिक लाभ देण्याची तरतूद आहे. अंतर्गत विभागाने शिष्यवृत्ती मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार अपंगत्वाच्या सर्व २१ प्रकारातील राज्यातील शिशुवर्ग ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रुपये, नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दरमहा ८०० रूपये (निवासी), ६०० रूपये (अनिवासी), अकरावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दरमहा १००० रूपये (निवासी), ८०० रूपये (अनिवासी) शिष्यवृत्ती मिळणार आहे. सदर शिष्यवृत्ती वाढ भरघोस असून या निर्णयाची लागलीच अंमलबजावणी केली जाणार आहे.
याशिवाय अकरावी व बारावीच्या अपंग विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क तसेच अंध विद्यार्थ्यांसाठी दरमहा १५० रूपये वाचक भत्ता आणि दरवर्षी प्रत्यक्ष खर्चाच्या मर्यादेत १५०० रूपये अभ्यास दौऱ्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येईल. शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ केल्याने २३ कोटी ११ लाख रूपयांचा राज्य शासनावरचा बोजा वाढणार आहे.
अपंगांच्या योजनांसाठी एक खिडकी पोर्टल, अपंगांचे प्रमाणपत्र घेऊन शासकीय नोकरी मिळवणाऱ्या सर्वांची प्रमाणपत्र तपासणी, शासनाच्या 39 विभागातील अपंगांच्या आरक्षणाची स्थिती, अपंगांना स्वयंरोजगारासाठी पंधराशे रुपयांचे अनुदान, अपंगांच्या योग्य पुनर्वसनासाठी स्वतंत्र निधी आणि अपंगांच्या शाळांमध्ये नियमानुसार सुविधा असल्याबाबतची खात्री आदी निर्णय तुकाराम मुंढे यांनी आठ महिन्याच्या कार्यकाळात घेतले.
बदली पूर्वीचा ठरला शेवटचा निर्णय :
तुकाराम मुंढे हे दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या सचिव पदी सप्टेंबर २०२५ मध्ये आले. गेल्या आठ महिन्यात त्यांनी अपंगांसाठी अनेक मोठे निर्णय घेतले. त्यामधला त्यांचा बदली पूर्वीचा शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा निर्णय शेवटचा ठरला आहे. अपंगांच्या शिष्यवृत्ती मध्ये सोळा वर्षात एक रुपयांची सुद्धा वाढ करण्यात आली नव्हती. यापूर्वी शिष्यवृत्तीची रक्कम दरमहा १०० ते २०० रूपयांच्या दरम्यान होती.
