सगळीकडेच सध्या दिवाळीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. सण-उत्सवाच्या या काळात बाजारपेठा सजल्या असून खरेदीसाठी नागरिकांची तुफान गर्दी होत आहे. दिवाळी म्हटलं की फराळासोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईची मागणी प्रचंड वाढते. मात्र, याच पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

दोन दिवसांपेक्षा जास्त मिठाई साठवू नका!

पत्रकार परिषदेत बोलताना तुकाराम मुंढे यांनी दिवाळीतील मिठाई खरेदीबाबत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. सणासुदीच्या दिवसांत मिठाईला मोठी मागणी असते. त्यामुळे अनेकदा भेसळयुक्त किंवा शिळी मिठाई बाजारात येण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी नागरिकांनी केवळ २ दिवसांसाठी पुरेल इतकीच मिठाई खरेदी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. घरची मिठाई संपल्यानंतर गरजेनुसार बाजारातून पुन्हा ताजी मिठाई खरेदी करावी. असे त्यांनी स्पष्ट केले.

बनावट आणि भेसळयुक्त मिठाई कशी ओळखायची? मुंढेंनी काय सांगितलं?

जास्त आणि अती भडक रंग असलेली मिठाई खरेदी करणे टाळा. रसायनांचा अतिवापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. पाकिटावर किंवा डब्यावर मिठाई आणि खवा कधी तयार केला आहे, याची तारीख स्पष्ट लिहिलेली असेल तरच खरेदी करा. मुख्य म्हणजे, दोन दिवसांपेक्षा जास्त जुनी मिठाई घेणे टाळा. अनेकदा चांदीच्या वर्खाऐवजी ॲल्युमिनियम फॉईलचा वापर केला जातो. वर्ख खरा आहे की बनावट, हे ओळखण्यासाठी तो हातात घेऊन हलकासा चोळा. जर वर्ख हातातच पूर्णपणे विरघळला, तर तो शुद्ध चांदीचा आहे असे समजावे. परंतु, वर्खाची गोळी किंवा जाड फॉईल तयार झाली, तर तो हानिकारक ॲल्युमिनियम आहे हे ओळखावे. असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन

अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि ताजेपणा तपासणे ही काळाची गरज आहे, यावर त्यांनी भर दिला. नागरिकांनी खबरदारी बाळगून सुरक्षित आणि आनंदी वातावरणात दिवाळी साजरी करावी, असेही ते म्हणाले.

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा दणका; सणासुदीच्या काळात ९५४ परवाने निलंबित

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मोठ्या प्रमाणावर धाडी व धडक कारवाई सत्र राबवण्यात येत आहे. १ सप्टेंबरपासून प्रशासनाने तब्बल ९,६६७ आस्थापनांची कसून तपासणी केली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४,६०३ आस्थापनांना सुधारणांच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या कठोर कारवाईदरम्यान ९५४ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर २५ परवाने रद्द करण्यात आले आहेत.