Tukaram Mundhe FDA Action updates: अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळीविरोधात आणि हॉटेलातील अस्वच्छतेविरोधात कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची सध्या राज्यभरात चर्चा आहे. “नियामक आणि उद्योजक हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ग्राहक आणि नागरिकांसाठी सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ देणे, सुरक्षित औषधे पुरवणे हे दोघांचेही काम आहे. नागरिक, उत्पादक आणि नियामक हे एकाच परिसंस्थेचे भाग असून ते एकमेकांचे विरोधक नाहीत”, असा संदेश तुकाराम मुंढे यांनी नुकत्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दिला.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर यांच्या वतीने आयोजित केलेल्या फूड सेफ्टी समिटला तुकाराम मुंढे यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी राज्यभरात भेसळविरोधात सुरू असलेल्या कारवाईची माहिती दिली. तसेच या समिटमध्ये एफडीएचा उद्देश काय आहे आणि या संस्थेला आमच्याकडून काय अपेक्षा आहेत, याची चर्चा झाली.
अन्न व औषध प्रशासनाने ग्राहकांच्या तक्रारीसाठी नागरिक तक्रार पोर्टल तयार केल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. मागच्या २४ तासांत एकूण १० लाख लोकांनी पोर्टलला भेट दिली आहे. या पोर्टलवर टाईप करून किंवा व्हाईस नोट अपलोड करून तक्रार करता येते, असेही मुंढे यांनी सांगितले. तसेच अन्न व औषध प्रशासन विभाग पुढील वर्षभरात सर्व काम ऑनलाईन ऑटोमेशनद्वारे चालविण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.
हिंदीत नाही इंग्रजीत बोलेन
महिन्याभरात महाराष्ट्रात किती ठिकाणी कारवाई झाली आहे, तसेच कोणत्या नियमाच्या आधारे कारवाई केली, याचीही माहिती तुकाराम मुंढे यांनी या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांना हिंदीतही प्रश्न विचारण्यात आले. मात्र आपण हिंदीत नाही तर इंग्रजीत उत्तर देऊ, असे नम्रपणे मुंढे यांनी सांगितले.
बदली झाली तर कारवाई होणार का?
तुकाराम मुंढे यांची बदली ज्या विभागात होते, त्या विभागात व्यवस्थित काम चालते. मात्र कालांतराने त्यांची बदली केली जाते. जर या विभागातून बदली झाली तर पहिले पाढे पंचावन्न होणार का? असाही प्रश्न यावेळी विचारण्यात आला. यावर तुकाराम मुंढे म्हणाले की, माझा प्रयत्न व्यवस्था सुधारण्याचा असतो. कायद्याच्या कसोटीवरील व्यवस्था लावणे, हेच माझ्यासमोरचा उद्देश आहे. कारवाई हा त्यातील केवळ एक भाग झाला. पण आमच्या मनुष्यबळाला ताकद देणे, त्यांच्यात आणि उत्पादकांमध्ये जागृती निर्माण करणे, ऑटोमेशन करणे, इन्सपेक्शन करणे अशाप्रकारची अनेक कामे विभागामार्फत सुरू आहेत.
पंढरीच्या वारीतील फोटोवर काय म्हणाले?
पंढरीच्या वारीत संत तुकाराम महाराज यांच्या रुपात तुकाराम मुंढे यांचे फोटो झळकले आहेत. याबद्दलही मुंढे यांना विचारणा झाली. यावर ते म्हणाले, हे प्रेम दिल्याबद्दल मी मनापासून सर्वांचा आभारी आणि कृतज्ञ आहे. लोकांचा सेवक म्हणून मी असाच यापुढे काम करण्याचा प्रयत्न करेन.
