अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून आपल्या धडाकेबाज कारवायांनी राज्यभरातील भेसळमाफियांना सळो की पळो करून सोडणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे सध्या पुन्हा एकदा प्रचंड चर्चेत आले आहेत. अशातच बुलढाण्यातील एका ७५ वर्षीय आजींचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, त्यांनी मुंढे यांना थेट बुलढाण्यात येऊन धडक कारवाई करण्याची कळकळीची विनंती केली आहे.

“मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात आणि खामगावात या… इकडचे साहेब लोक पैसे खातात आणि काहीच कारवाई करत नाहीत,” असा गंभीर आरोप करत या आजींनी स्थानिक प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत.

‘तेलापासून भाजीपाल्यापर्यंत सगळीकडे भेसळ’; आजींचे आरोप काय?

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आजींनी आपल्या भागातील अन्नभेसळ आणि भ्रष्टाचारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

“मुंढे साहेब, आमच्या बुलढाणा जिल्ह्यात आणि खामगावात सगळ्याच गोष्टींमध्ये नुसती भेसळ सुरू आहे. दुकानातील तेलात, केळी आणि पपई पिकवण्यासाठी रासायनिक औषधे वापरली जात आहेत. भाजीपाल्यामध्येही भेसळ आहे. इकडचे साहेब लोक फक्त पैसे खातात आणि गप्प बसतात, कोणीच काम करत नाही,” असा आरोप आजींनी केला आहे.

एवढेच नव्हे तर स्थानिक सरकारी दवाखान्यातही मोठा घोटाळा सुरू असून याकडे कोणीही लक्ष देत नसल्याची व्यथा त्यांनी मांडली. त्यामुळे मुंढे साहेबांनी स्वतः येथे येऊन या साखळीचा पर्दाफाश करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.

राज्यभरात ‘मुंढे पॅटर्न’चा दणका

तुकाराम मुंढे यांनी एफडीएचे आयुक्तपद हाती घेतल्यापासून हॉटेल्समधील अस्वच्छता, भेसळयुक्त पनीर, बनावट दूध तसेच प्रतिबंधित गुटखा आणि पानमसालाविरोधात राज्यव्यापी धडक मोहीम उघडली आहे. त्यांच्या या कडक आणि पारदर्शक कार्यपद्धतीमुळे सामान्य जनतेमध्ये मोठा विश्वास निर्माण झाला आहे.

त्यामुळेच स्थानिक यंत्रणेकडून न्याय आणि कारवाई होत नसल्याने वैतागलेल्या बुलढाण्याच्या या आजींनी थेट तुकाराम मुंढे यांच्याकडेच ‘साकडे’ घातले आहे. सध्या हा व्हिडीओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडूनही यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत.