Tukaram Mundhe FDA Action: निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आणि औषधांवर कडक कारवाई केल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा न्युट्रास्युटिकल्स म्हणजेच प्रोटिन पावडर आदी पोषणविषयक औषधे आणि दारूतील भेसळीकडे वळवला आहे.

दावे, प्रिस्क्रिप्शन सारे तपासणार

इंडियन एक्स्प्रेस आयोजित आयडिया एक्सचेंज या कार्यक्रमात आज तुकाराम मुंढे यांनी ही माहिती दिली. न्युट्रासिटिकल्सच्या संदर्भात त्यातील घटक, लेबल, त्यासंदर्भात केले जाणारे दावे, प्रिस्क्रिप्शन शिवाय होणारी विक्री आदी सर्व बाबींची पडताळणी एफडीएतर्फे सुरू असून येत्या काही दिवसांत त्या संदर्भातील कारवाईला सुरुवात होईल.

Tukaram Mundhe FDA Action on adulterated food | Adulterated Liquor Protein Powder crackdown Maharashtra | तुकाराम मुंढे एफडीए अन्न औषध प्रशासन कारवाई | दारू आणि प्रोटिन पावडर भेसळ कारवाई
भेसळयुक्त दारूवर तुकाराम मुंढे करणार कारवाई

सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित अन्न मिळणे आणि त्या संदर्भात जनजागृती व्हावी हेच या कारवाईमागचे प्रमुख हेतू आहेत. खरे तर या संदर्भातील कायदे २००६ आणि २०११ साली अस्तित्वात आले आहेत. आता त्याची कठोर अंमलबजावणी सुरू आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे तर यापूर्वीही इथल्या अन्न आणि औषध प्रशासनाने चांगली कामगिरी केली होती, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

केंद्रीय पातळीवरही दखल

यापूर्वी वेगवेगळ्या वयोगटाशी संबंधित खाद्यपदार्थांच्या संदर्भात कारवाई करण्यात आली. नवजात बालकांसाठी म्हणून बाजारात मिळणारे अन्न, त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांसाठीचे अन्न त्या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेऊन कारवाई केली. राज्यातील अनेक कारवाईंची दखल केंद्रीय पातळीवरही घेण्यात आली आणि तसे आदेश केंद्रीय यंत्रणांकडून जारीही झाले.

आता तरुण वर्गाकडे एफडीएने मोर्चा वळवला असून, येणाऱ्या काळात तरुण वर्गाकडून पसंती मिळालेल्या खाद्यपदार्थांच्या संदर्भातील कारवाईला सुरुवात होईल. निकृष्ट खाद्यपदार्थांचा परिणाम हा काही केवळ शरीरावर होत नाही, तर आपल्या उत्पादकतेवर आणि सकल राष्ट्रीय उत्पन्नावरही (जीडीपी) होत असतो. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाचीच आहे, असेही मुंढे म्हणाले.

दारुमध्ये ६०टक्क्यांहून अधिक भेसळ

अलीकडे केलेल्या तपासणीमध्ये दारूमध्येही ६० टक्क्यांहून अधिक भेसळ असल्याचे लक्षात आले असून त्यामुळे त्या संदर्भातही कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याचे मुंढे यांनी सांगितले. अन्नातील भेसळ सर्वाधिक घातक असून त्या संदर्भातील जनजागृतीसाठी या विषयाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात व्हायला हवा, तोही अगदी पहिली पासून, असेही मुंढे म्हणाले.

गणेशोत्सवादरम्यानच्या कारवाईचा संबंध धर्माशी जोडला गेला. मात्र याचा थेट संबंधी मानवी स्वास्थ्याशीच आहे. निकृष्ट दर्जाचे ५० टन एवढे खाद्यपदार्थ गणेशोत्सवादरम्यान जप्त करण्यात आले. यावरून ही अन्नभेसळ किती घातक आणि किती मोठ्या प्रमाणावर होते आहे, हेच लक्षात येईल. दरम्यानच्या काळात यूएस एफडीए अर्थात अमेरिकेतली अधिकारी आणि त्याचप्रमाणे जपानी एफडीएच्या अधिकाऱ्यांनीही आपल्या कार्यालयास भेट देऊन चर्चा केल्याची माहितीही मुंढे यांनी दिली. आपल्या फ्रिजमध्ये असलेल्या वस्तूंचा शोध घेतला तर ९० टक्क्यांहून अधिक पदार्थाची एक्सपायरी डेट उलटून गेलेली आहे, असे लक्षात येईल, असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.