आपल्या कडक आणि धडक कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुंढे आपल्या मित्रासोबत एका हॉटेलमध्ये जेवायला गेले असतानाचा एक रंजक अन् तितकाच विचार करायला लावणारा किस्सा त्यांनी सांगितला आहे. झालं असं की मुंढे मित्रासोबत एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. तिथे त्यांच्या मित्राने ‘पनीर’ची भाजी मागवली होती, पण आलेल्या भाजीतील ‘पनीर’ बनावट असल्याचे मुंढे यांच्या तीक्ष्ण नजरेने क्षणात ओळखले आणि त्यानंतर हॉटेलचालकांची चांगलीच धांदल उडाली!

“जेवायला आलोय, पण तरीही नजर नियमांवरच….”

‘एनडीटीव्ही प्रॉफिट’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत तुकाराम मुंढे यांनी या प्रसंगाची आठवण सांगितली.

FDA आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच एका मित्राने मुंढे यांना हॉटेलमध्ये जेवणाचे आमंत्रण दिले होते. हॉटेलमध्ये जातानाच मुंढे यांनी मित्राला गमतीत म्हटले होते, “मी कुठेही गेलो तरी आजूबाजूला नियमांचे उल्लंघन तर होत नाही ना, हे पाहण्याची मला सवय आहे. त्यामुळे आज जेवतानाही माझी नजर नियमभंगाकडेच असेल.”

हॉटेलमध्ये बसल्यानंतर मुंढे यांच्या लक्षात आले की, तेथे अन्न सुरक्षेचे अनिवार्य परवानापत्र (Food Licence) प्रमुख ठिकाणी लावलेले नाही. तसेच पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेबाबतही त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले.

पनीर पाहताच म्हणाले…”हे अस्सल पनीर नव्हे!”

त्याच वेळी त्यांच्या मित्राने पनीरची भाजी मागवली. “मी मित्राला आधीच सांगितले होते, पनीर मागवू नकोस, कारण ते माझ्या नजरेच्या चाचणीत बहुधा पास होणार नाही,” असे मुंढे म्हणाले.

टेबलावर पनीरची डिश येताच मुंढे यांनी त्याचे बारकाईने निरीक्षण केले. ते वनस्पती तेल आणि स्टार्चपासून बनवलेले ‘अ‍ॅनालॉग पनीर’ (Analogue Paneer) असल्याचा संशय त्यांना आला.

“मी हॉटेल कर्मचाऱ्यांना पुन्हा विचारले, हे खरोखरच अस्सल पनीर आहे का? मी तपासले असता ते नक्कीच अस्सल पनीर नव्हते,” असे सांगत मुंढे यांनी मित्राला ते खाण्यापासून रोखले.

२४ तासांचा अल्टिमेटम अन् थेट कारवाई

या प्रकारानंतर मुंढे यांनी तात्काळ कोणतीही कारवाई न करता अत्यंत संयमाने हॉटेल व्यवस्थापनाकडे या गंभीर बाबी मांडल्या. त्यांनी हॉटेलचालकाला त्रुटी सुधारण्यासाठी २४ तासांची मुदत दिली.

“२४ तासांनंतर मी माझ्या अधिकाऱ्यांना तेथे तपासणीसाठी पाठवले. दिलेल्या वेळेत सुधारणा झाली की नाही याची तपासणी झाली… आणि पुढे काय घडले, तो इतिहास आहे,” असे मुंढे यांनी सांगितले.

राज्यात ‘एफडीए’चा धडक धडाका

२००५ च्या बॅचचे आयएएस (IAS) अधिकारी असलेल्या तुकाराम मुंढे यांनी तीन महिन्यांपूर्वीच महाराष्ट्र ‘एफडीए’चे आयुक्तपद स्वीकारले आहे. पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी राज्यभरात भेसळयुक्त अन्न आणि अस्वच्छतेविरोधात मोठी मोहीम उघडली आहे.

  • रेस्टॉरंट्स, आईस्क्रीम पार्लर्स, डेअरी आणि ई-कॉमर्स केंद्रांवर विशेष लक्ष.
  • गेल्या दोन महिन्यांत ३१० पेक्षा जास्त ठिकाणी प्रत्यक्ष तपासणी.
  • नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १६५ आस्थापनांचे परवाने निलंबित.
  • ७५० हून अधिक हॉटेल्स आणि आस्थापनांना सुधारणा नोटीस जारी.

टीकेला थेट अन् रोखठोक उत्तर

मुंढे यांच्या या कडक कारवाईवर आणि परवाने निलंबित करण्याच्या पद्धतीवर काही घटकांकडून टीकाही होत आहे. ‘ही कारवाई गरजेपेक्षा जास्त कडक आहे का?’ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

यावर बोलताना मुंढे म्हणाले:

“जर सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होत असेल, तर तात्काळ पावले उचलणे हे आमचे कर्तव्यच आहे. जर ही कारवाई जास्त वाटत असेल, तर ‘योग्य प्रमाणाची’ व्याख्या काय, हे मला माहीत नाही!”

स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी ही मोहीम चालवली जात असल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. “हे माझ्याबद्दल नाही, तर अन्न सुरक्षा आणि नागरिकांच्या आरोग्याविषयी आहे. ज्या दिवशी एफडीएला कुठेही कारवाई करायला जावे लागणार नाही आणि एफडीए बंद करण्याची वेळ येईल, तो माझ्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस असेल!” अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.