महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सणासुदीच्या काळात राज्यभर विशेष कारवाई केली. या कारवाईत १९ अन्नपदार्थ विक्रेत्या व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले, तसेच सुमारे ३.५३ लाख किलो खाद्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या खाद्य पदार्थांची किंमत ९ कोटी रुपये आहे.
पतंजलीचं २ हजार २७९ लिटर गायीचं तूप जप्त
जप्त केलेल्या साठ्यामध्ये पतंजलीच्या २ हजार २७९ लिटर गायीच्या तुपाचा समावेश आहे. याची किंमत २० लाख रुपये आहे. हे तूप छत्रपती संभाजीनगर येथील कंपनीचे सुपर वितरक मेसर्स दिव्य महावितरक यांच्याकडून जप्त करण्यात आले. चुकीचे लेबलिंग आणि भेसळीच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे असं अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
स्वच्छतेसंबंधीच्या त्रुटी आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई
FDA ने नियमांमधील स्वच्छतेसंबंधी त्रुटी आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर येथील नमकीन, मिठाई आणि मसाले उत्पादक कंपन्यांसह अनेक आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. तसेच, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) भिवंडी येथील अॅव्हेन्यू सुपर मार्ट्समधून १ लाख ४४ हजार २१८ किलो खाद्यतेल, तर सातारा येथील अमीन ट्रेडर्सकडून २० हजार ५६० किलो खाद्यपदार्थ जप्त केले. २८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात आलेल्या या मोहिमेत १३ गुन्हे दाखल करण्यात आले, १६ जणांना अटक करण्यात आली, सात आस्थापने सील करण्यात आली आणि सहा वाहने जप्त करण्यात आली. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
