अलिबाग : रायगडच्या पर्यटनाला समुद्रकिनारे, किल्ले आणि निसर्गसौंदर्याची जोड असली तरी येथील अस्सल कोकणी खाद्यसंस्कृती हे पर्यटकांसाठी तितकेच मोठे आकर्षण आहे. घरगुती पद्धतीच्या जेवणासाठी पर्यटक आवर्जून स्थानिक खाणावळींचा शोध घेतात. मात्र, तुकाराम मुंढे यांच्या अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) सुरू असलेल्या परवाना तपासणीमुळे अल्प भांडवलावर व्यवसाय करणाऱ्या घरगुती खाणावळचालकांमध्ये चिंता वाढली आहे. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, काशीद, मांडवा, दिघी आदी पर्यटनस्थळांच्या परिसरात अनेक स्थानिकांनी घरातूनच खाणावळी सुरू केल्या आहेत. काही व्यवसाय वर्षभर सुरू असतात, निवास आणि न्याहारी केंद्र अनेक ठिकाणी कार्यरत आहेत, यातून पर्यटन हंगामात अनेक कुटुंब या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न मिळवतात. अनेक कुटुंबांसाठी हा व्यवसाय उदरनिर्वाहाचे साधन असून, महिलांनाही त्यातून रोजगार व आर्थिक उत्पन्न मिळत आहे.
मोठ्या हॉटेल्सच्या तुलनेत स्थानिक घरगुती खाणावळीत मिळणाऱ्या ताज्या मासळीच्या पदार्थांना आणि पारंपरिक कोकणी जेवणाला पर्यटकांची विशेष पसंती असते. त्यामुळे या खाणावळी केवळ स्थानिक व्यवसाय न राहता रायगडच्या पर्यटन व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग बनल्या आहेत.
परवान्याच्या नियमांबाबत अनभिज्ञता
अन्न व्यवसायासाठी आवश्यक परवाना घेणे बंधनकारक असले तरी अनेक छोट्या व्यावसायिकांना परवाना प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि नियमांची पुरेशी माहिती नसल्याचे तपासणीत पुढे येत आहे. त्यामुळे कारवाईच्या भीतीने काही खानावळचालक व्यवसाय बंद करण्याचा विचार करत आहेत.
विशेषतः घरातून किंवा अत्यल्प भांडवलावर व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यावसायिकांसाठी परवाना प्रक्रिया आणि नियमांची पूर्तता करणे आव्हानात्मक ठरत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. काशीद परिसरातील व्यावसायिकांनी त्यामुळे कारवाईसोबतच मार्गदर्शन करण्याची मागणी केली आहे.
अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि ग्राहकांचे आरोग्य यासाठी अन्न औषध प्रशासनाची तपासणी आवश्यक आहे. मात्र, मोठ्या आस्थापनांप्रमाणेच छोट्या घरगुती खाणावळींवरही नियमांची अंमलबजावणी करताना त्यांच्या व्यावसायिक परिस्थितीचा विचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
परवाना नसलेल्या व्यावसायिकांना थेट कारवाई करण्यापेक्षा प्रथम नियमांची माहिती देणे, परवाना काढण्याची प्रक्रिया समजावून सांगणे आणि आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. नियमांचे पालन करणाऱ्यांना प्रोत्साहन आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई, अशी दुहेरी भूमिका घेतल्यास अन्नसुरक्षेचे उद्दिष्ट साध्य होण्याबरोबरच स्थानिक रोजगारही टिकवता येईल.
रायगडमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी स्थानिक खाद्यसंस्कृती हा पर्यटन अनुभवाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे घरगुती खाणावळी मोठ्या प्रमाणावर बंद झाल्यास पर्यटकांना मिळणाऱ्या अस्सल कोकणी पदार्थांच्या पर्यायांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. परिणामी स्थानिक रोजगारासोबतच पर्यटन व्यवसायालाही अप्रत्यक्ष फटका बसू शकतो. त्यामुळे एफडीएची कारवाई थांबविण्याची नव्हे, तर कारवाईसोबत मार्गदर्शन आणि परवाना प्रक्रियेबाबत सुलभता निर्माण करण्याची गरज असल्याचे स्थानिक व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे.
