Tukaram Mundhe FDA chief 100 days Review : राज्यभरात सर्वाधिक चर्चेत असलेले महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना हे पदभार स्वीकारल्यास नुकतंच १०० दिवस पूर्ण झाले आहेत. या १०० दिवसांच्या काळात तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनासंबंधित अनेक कठोर निर्णय घेतले. अनेक आस्थापनांवर कारवाई करून राज्यात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. दरम्यान, या १०० दिवसांच्या कार्यकाळात तुकाराम मुंढे यांनी अन्नसुरक्षेचा प्रश्न हा सार्वजनिक आरोग्यातील गंभीर संकट बनले असून, त्यासाठी अधिक प्रभावी, दृश्यमान आणि ठाम नियामक यंत्रणेची गरज असल्याचं म्हटलं आहे.

‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत मुंढे यांनी त्यांच्या पहिल्या १०० दिवसांचा अनुभव, FDA मधील प्रयोगशाळांच्या प्रलंबित चाचण्या, रुग्णालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्याचं आणि औषधांचं नियमन तसंच शाळांमध्ये आरोग्यदायी आहाराबाबत त्यांनी घेतलेल्या वादग्रस्त निर्णयावर भाष्य केले.

सार्वजनिक आरोग्यावरील संकट

अन्न क्षेत्रातील समस्या आतापर्यंत समोर आलेल्या प्रकारांपेक्षा प्रत्यक्षात खूप मोठी आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर तुकाराम मुंढे म्हणाले, “निश्चितच. हे मोठ्या प्रमाणावरील सार्वजनिक आरोग्याचं संकट आहे. सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेनेही याकडे लक्ष वेधलं आहे. स्वातंत्र्याच्या वेळी एकूण आजारांच्या ओझ्यात संसर्गजन्य आजारांचा वाटा सुमारे ७० टक्के होता. आज असंसर्गजन्य आजारांचा वाटा जवळपास ७० टक्के आहे. त्यामागील दोन प्रमुख कारणं म्हणजे आहार आणि औषधांचं सेवन. विशेषतः आरोग्यास अपायकारक चरबी, साखर आणि मीठाचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचं अनियंत्रित सेवन ही मोठी समस्या आहे.”

ते पुढे म्हणाले, “लोकसंख्या वाढल्याने मागणी वाढली आणि त्यानुसार पुरवठाही झाला. महाराष्ट्रात दररोज १.५ कोटींपेक्षा अधिक अंडी आयात केली जातात, कारण स्थानिक उत्पादन मागणी पूर्ण करू शकत नाही. दुधाच्या बाबतीत आपण दररोज सुमारे १.८ ते २ कोटी लिटर दूध उत्पादन होत असल्याचे सांगतो. मात्र राज्यातील दूध देणाऱ्या जनावरांची संख्या पाहता हे उत्पादन आकडेवारीशी जुळत नाही. मग हे दूध येतं कुठून? हा केवळ हॉटेलमधील अन्न भेसळीचा किंवा दूधजन्य पदार्थांमधील भेसळीचा प्रश्न नाही. हा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे आणि त्यातूनच तो देशाच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न बनतो.”