मुंबई : अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यानंतर राज्यभरात कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. पुणे, धाराशिव, छत्रपती संभाजी नगर येथे केलेल्या धडक कारवाईमुळे भेसळ, कमी प्रतीच्या मालाची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. निकृष्ट अन्न पदार्थांवर होत असलेल्या कारवाईचे जनसामान्यांतून कौतुक होत आहे.

तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी, २६ मे रोजी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार स्विकारला. पदभार स्विकारलेल्या दिवशीच पुणे जिल्ह्यातील निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे आंबे पिकविण्यासाठी रसायनांचा वापर केल्यावरून २०,००० रुपये किंमतीचे ८०० किलो आंबे जप्त करण्यात आले.

छत्रपती संभाजी नगरमध्येही मंगळवारी कारवाई करण्यात आली. तब्बल ४०, ९६० रुपये किंमतीचे निकृष्ट दर्जाचे गायीचे तुप जप्त करण्यात आले. बुधवारी, २७ मे रोजी धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे निकृष्ट दर्जाचा ४७,३०० रुपये किंमतीचा २१५ किलो खवा जप्त केला आहे. या प्रकरणी एकूण सहा जणांवर गुन्हे दाखल करून कारवाई सुरू करण्यात आली आहे.

कारवाई सुरूच राहील

निकृष्ट, भेसळयुक्त, आरोग्याला अपायकारक खाद्य पदार्थ आणि फळे पिकविण्यासाठी घातक रसायनांचा वापर कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. ग्राहकांना दर्जेदार, भेसळमुक्त, रसायनमुक्त अन्न पदार्थ, फळे मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे करवाई सुरूच राहील, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

अशी झाली कारवाई

मंगळवार – निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे २०,००० रुपये किंमतीचे ८०० किलो आंबे जप्त

मंगळवार – छत्रपती संभाजी नगरमध्ये ४०, ९६० रुपये किंमतीचे निकृष्ट दर्जाचे गायीचे तुप जप्त

बुधवार – धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे निकृष्ट दर्जाचा ४७,३०० रुपये किंमतीचा २१५ किलो खवा जप्त