Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांच्या विरोधात धडक कारवायांची मोहीम हाती घेतलेली आहे. भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात तुकाराम मुंढे यांनी कारवायांचा धडाका लावलेला आहे. त्यामुळे त्यांच्या या धडाकेबाज कामाची राज्यातच नाही तर देशभरात मोठी चर्चा सुरू आहे.
दरम्यान, तुकाराम मुंढेंच्या कामाचा धडाका पाहता अनेकदा काही अधिकाऱ्यांना किंवा मंत्र्यांना त्यांच्या विभागात तुकाराम मुंढे नको असतात अशा चर्चा समोर आलेल्या आहेत. कारण तुकाराम मुंढे हे फार आक्रस्ताळेपणा करतात असाही आरोप त्यांच्यावर अनेकदा केला जातो. आता याच आरोपांवर तुकाराम मुंढे यांनी साम टीव्ही या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना महत्वाचं भाष्य केलं आहे.
“मी जर आक्रस्ताळेपणा केला असता तर काम केलेल्या ठिकाणी बदल दिसले असते का? भेसळयुक्त अन्न बंद करण्याला आक्रस्ताळेपणा म्हणायचे का?”, असा सवाल विचारत तुकाराम मुंढेंनी सर्व आरोप फेटाळून लावले.
तुकाराम मुंढे काय म्हणाले?
तुमच्या कामांचं लोक कौतुक करतात. मात्र, याच जनतेचे जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्यात दबक्या आवाजात अशी चर्चा असते की तुकाराम मुंढे हे कोणाचंच ऐकत नाहीत. किंवा तुकाराम मुंढे हे फारच आक्रस्ताळे आहेत, ते आक्रस्ताळेपणा करतात. ते फक्त विरोधातच काम करतात असे आरोप तुमच्यावर केले जातात असा प्रश्न मुलाखतीत विचारण्यात आला. यावर बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, “मला असं एखादं उदाहरण द्या की मी आक्रस्ताळेपणा केलाय. मी नेमकं कुठे आणि कोणत्या गोष्टीत आक्रस्ताळेपणा केला किंवा मी तसं वागलो. हे मलाही कळलं पाहिजे. तेव्हा मी त्यावर सविस्तर बोलू शकेन.”, असं मुंढे म्हणाले.
‘मी आक्रस्ताळेपणा करत नाही, तर…’
“माझं स्पष्ट म्हणणं आहे की मी आक्रस्ताळेपणा करत नाही. जर मी आक्रस्ताळेपणा केला असता तर त्यावर नक्कीच अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या असत्या. जर मी आक्रस्ताळेपणा केला असता तर त्याचे वाईट परिणाम झाले असते. जर मी आक्रस्ताळेपणा केला असता आणि सरकारचं किंवा प्रशासनाचं ऐकलं नसतं तर माझ्यावर कारवाई देखील झाली असती. जर मी आक्रस्ताळेपणा केला आहे, तर मग आता फूड सेफ्टीमध्ये का फरक पडतोय? मी आक्रस्ताळेपणा केला असता, तर मी ज्या-ज्या ठिकाणी कामे केली तेथे बदल दिसले असते का? जर मी आक्रस्ताळेपणा करत असेल तर लोक माझ्या कामाचं कौतुक का करतात? चुकीचे खाद्यपदार्थ आपण बंद करण्याचा प्रयत्न केला मग याला आक्रस्ताळेपणा म्हणायचं का?”, असे अनेक सवाल तुकाराम मुंढे यांनी केले.
मंत्र्यांना किंवा अधिकाऱ्यांना तुम्ही का नको असतात?
एखाद्या मंत्र्यांला किंवा अधिकाऱ्यांना तुम्ही त्यांच्या विभागात का नको असतात? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तुकाराम मुंढे म्हणाले की, “याबाबत मला असं विचारायचं आहे की, मी जे आता काम करतोय, म्हणजे मग तुम्हाला सेफ फूड नको आहे का? शेतकऱ्यांच्या दुधाचे भाव वाढलेले नको आहेत का? सेफ ड्रग नको आहेत का? मग काय फक्त चुकीचे हॉटेल्स चालवायला हवे का? ज्यांना चुकीच्या गोष्टी चालवायच्या असतील म्हणून त्यांना जर मी नको वाटत असेल तर मला हरकत नाही, मला काही अडचण नाही”, असं तुकाराम मुंढेंनी म्हटलं.
“समजा एखाद्या महापालिकेत मी नको असं म्हणतात, मग तुम्हाला संबंधित महापालिकेत जे प्रकल्प गरजेचे नाहीत त्यांना मी नको म्हणतो म्हणून मी नको आहे का? शहरातील ड्रेनेज लाइन मी चांगल्या करण्याचा प्रयत्न करतो, मग ते तुम्हाला नको आहेत का? मी रस्ते चांगले करण्याचा प्रयत्न करतो, मग तुम्हाला रस्ते चांगले नको आहेत का? तुम्हाला चांगली टेक्नॉलॉजी नको आहे का? मी एखाद्या शहराचा पाणीपुरवठा चांगला करण्याचा प्रयत्न करतो, मग तुम्हाला हे नको आहे का? तुम्हाला चांगल्या गोष्टी नकोच आहेत का?”, असे सवाल तुकाराम मुंढे यांनी केले.
‘ही समाजाची जबाबदारी आहे’
“गुड गव्हर्नन्सचे कोणतेही नियम आपण जेव्हा लावतो, तेव्हा त्यामध्ये जर हे चांगले नियम कोणाला नको असतील तर हे योग्य आहे का? असा प्रश्न आहे. मग यामध्ये नेमकं कोण चुकतंय हे पाहण्याची तुमची, आमची आणि समाजाची देखील जबाबदारी आहे”, असं मत तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केलं आहे.
