Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून राज्यभरात मोठ्या कारवायांचा धडाका सुरू आहे. अन्नपदार्थांत भेसळ करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, भेसळखोरांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिलेला आहे. तुकाराम मुंढे यांच्या विभागाने सुरू केलेल्या कारवायानंतर राज्यातील भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सध्या राज्यभरात सुरू असलेल्या कारवायांवरून तुकाराम मुंढे यांची मोठी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवरही तुकाराम मुंढे यांनी सविस्तर भूमिका मांडली. तसेच तुम्ही कधी उद्विग्न झाला आहात का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर तुकाराम मुंढे यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. ‘कमीत कमी चार ते पाच वेळा असं घडलं. असे अनेक प्रसंग आयुष्यात आले आहेत’, असं तुकाराम मुंढे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना म्हटलं आहे.

तुकाराम मुंढे काय म्हणाले?

तुम्ही कधी फार उद्विग्न झाला आहात का? आता खूप झालं, हे सहन होत नाही, त्यामुळे तुम्ही उद्विग्न झालात असं कधी घडलं का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, “हो, असं कमीत-कमी चार ते पाच वेळा झालं आहे. असे अनेक प्रसंग आयुष्यात आले आहेत. खरं तर असे प्रसंग कोणाच्याही आयुष्यात येऊ नयेत. आता मला ते प्रसंग या ठिकाणी बोलताही येणार नाहीत. अगदी कुटुंबाबरोबरही यावर चर्चा करता येत नाही, अशाही गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळे घरी आपली मुलं असतात, ते यावर काही प्रतिक्रिया देत नाहीत. पण ते सर्व पाहत असतात, ऐकत असतात. त्यामुळे मी एक प्रश्न स्वत:ला विचारत असतो आणि जबाबदारी घेत असतो. समजा मी आता महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचा आयुक्त आहे. मग त्या विभागाची जबाबदारी मी घेणार नाही तर कोण घेणार? असा प्रश्न मी स्वत: ला विचारत असतो”, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.

हॉटेल्सचे परवाने का निलंबित करता?

हॉटेल्सवरील कारवाई वेळी तुम्ही थेट कुलूप का लावता? नोटीस देऊन सुधारण्याची संधी तुम्ही देऊ शकता, तुम्ही असं का करत नाहीत? या प्रश्नावर बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, “काय होतं की काही मीडिया असतात. माझी दररोज प्रेस नोट येत असते. त्या प्रेसनोटमधील कोणता मुद्दा जास्त हायलाईट होतो, तर फक्त लायन्सन सस्पेंडचा. माझ्या प्रेसनोटमध्ये बाकीच्या पण गोष्टी लिहिलेल्या असतात. तुम्ही हवं तर प्रेसनोट चेक करून पाहू शकता. पण त्या गोष्टी हायलाईट केल्या जात नाहीत” असं स्पष्टीकरण तुकाराम मुंढे यांनी दिलं.

“आता अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे मी हाती घेतल्याचे जवळपास दोन महिने झाले आहेत. या कालावधीत जवळपास १४०० च्या आसपास व्हिजीट झालेल्या आहेत, त्यापैकी १०० ते ११० च्या आसपास लायन्सन सस्पेंडच्या केसेस आहेत. ३०० पेक्षा जास्त फक्त नोटीस देण्याच्या कारवाया झालेल्या आहेत. तसेच बाकीच्यांना काहीही झालेलं नाही. त्यामुळे यामध्ये असं आहे की आपण जेव्हा कारवाई करतो, तेव्हा ती कारवाई नियमानुसार असते. त्यासाठी एक कायदा असतो. कायद्यानुसार, लायन्सन सस्पेंड करण्याचे अधिकार आपल्याकडे आहेत. जेव्हा असुरक्षित फूडचा विषय असतो, तेव्हा लायन्सन सस्पेंड केलं जातं”, असंही तुकाराम मुंढे यांनी सांगितलं आहे.