Tukaram Mundhe FDA : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी हाती घेतल्यापासून तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांच्या विरोधात धडक कारवायांची मोहीम हाती घेतलेली आहे. भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात तुकाराम मुंढे यांनी कारवायांचा धडाका लावलेला आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या या धडाकेबाज कामाची फक्त राज्यातच नव्हे तर देशभरात मोठी चर्चा सुरू आहे.

तुकाराम मुंढे यांच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने आतापर्यंत भेसळयुक्त पनीर, भेसळयुक्त दूध, रेस्टॉरंट्स, हॉटेलवरील निकृष्ट दर्जाचं जेवण किंवा शैक्षणिक संस्थांमधील खाणावळी, कॅन्टीन अशा अनेक कारवाया करण्यात आलेल्या आहेत. तुकाराम मुंढे यांच्याकडून कायम अनेक कारवाया केल्या जात असतात. मात्र, तुकाराम मुंढे यांच्या कामाचा धडाका पाहता अनेकदा काही अधिकाऱ्यांना किंवा मंत्र्यांना त्यांच्या विभागात तुकाराम मुंढे नको असतात, अशा चर्चा अनेकदा समोर आलेल्या आहेत. आता याच मुद्यांवर बोलताना तुकाराम मुंढे यांनी साम टीव्ही या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना महत्वाचं भाष्य केलं आहे.

मंत्र्यांना किंवा अधिकाऱ्यांना तुम्ही नको का असतात?

एखाद्या मंत्र्यांला किंवा अधिकाऱ्यांना तुम्ही त्यांच्या विभागात का नको असतात? असा प्रश्न मुलाखतीत विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तुकाराम मुंढे म्हणाले की, “याबाबत मला असं विचारायचं आहे की, मी जे आता काम करतोय, म्हणजे मग तुम्हाला सेफ फूड नको आहे का? शेतकऱ्यांच्या दुधाचे भाव वाढलेले नको आहेत का? सेफ ड्रग नको आहेत का? मग काय फक्त चुकीचे हॉटेल्स चालवायला हवे का? ज्यांना चुकीच्या गोष्टी चालवायच्या असतील म्हणून त्यांना जर मी नको वाटत असेल तर मला हरकत नाही, मला काही अडचण नाही”, असं तुकाराम मुंढेंनी म्हटलं आहे.

“समजा एखाद्या महापालिकेत मी नको असं म्हणतात, मग तुम्हाला संबंधित महापालिकेत जे प्रकल्प गरजेचे नाहीत त्यांना मी नको म्हणतो म्हणून मी नको आहे का? शहरातील ड्रेनेज लाइन मी चांगल्या करण्याचा प्रयत्न करतो, मग ते तुम्हाला नको आहेत का? मी रस्ते चांगले करण्याचा प्रयत्न करतो, मग तुम्हाला रस्ते चांगले नको आहेत का? तुम्हाला चांगली टेक्नॉलॉजी नको आहे का? मी एखाद्या शहराचा पाणीपुरवठा चांगला करण्याचा प्रयत्न करतो, मग तुम्हाला हे नको आहे का? तुम्हाला चांगल्या गोष्टी नकोच आहेत का?”, असे सवाल तुकाराम मुंढे यांनी केले आहेत.

‘ही समाजाची जबाबदारी आहे’

“गुड गव्हर्नन्सचे कोणतेही नियम आपण जेव्हा लावतो, तेव्हा त्यामध्ये जर हे चांगले नियम कोणाला नको असतील तर हे योग्य आहे का? असा प्रश्न आहे. मग यामध्ये नेमकं कोण चुकतंय हे पाहण्याची तुमची, आमची आणि समाजाची देखील जबाबदारी आहे”, असं मत तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केलं आहे.