Tukaram Mundhe FDA : राज्यात सध्या तुकाराम मुंढे यांची मोठी चर्चा सुरू आहे. तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून राज्यभरात मोठ्या कारवायांचा धडाका सुरू आहे. अन्नपदार्थांत भेसळ करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, भेसळखोरांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिलेला आहे. त्यामुळे भेसळखोरांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
राज्यभरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सुरू असलेल्या कारवायांवर तुकाराम मुंढे यांनी सविस्तर भूमिका मांडली. तसेच एक धक्कादायक अनुभव देखील तुकाराम मुंढे यांनी सांगितला. आयुष्यात आपण कधी उद्विग्न झालो, यावरही तुकाराम मुंढे यांनी भाष्य केलं. ‘ज्या महिला माझा सत्कार करण्यासाठी आल्या होत्या, त्यांनीच माझ्याविरोधात पोलीसांत तक्रार दाखल केली होती’, असा धक्कादायक अनुभव आल्याचं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलत होते.
तुकाराम मुंढे काय म्हणाले?
तुम्ही सरळ मार्गाने चालणार अशी भूमिका घेत असताना तुमच्या मार्गात काटे टाकण्याचा म्हणजे अडथळा आणण्याचा प्रयत्न होतो का? तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न कधी झाला का? या प्रश्नावर बोलताना तुकाराम मुंढे यांनी सांगितलं की, “असा खूप त्रास होतो आणि मला सुरुवातीला खूप जास्त त्रास झालेला आहे. त्याबाबत मी पुस्तकात देखील शेवटी उल्लेख केलेला आहे. माझं एक वर्षांचं प्रशिक्षण झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्याला माझी प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. तेव्हा मी बार्शीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण विरोधी कारवाई केली होती. जवळपास १३०० ते १४०० अतिक्रमण काढले होते.”
“तेव्हा दोन ते तीन महिला बुके घेऊन मला भेटण्यासाठी आल्या होत्या, त्यांना माझा सत्कार करायचा होता. त्यामुळे मी गार्डला सांगितलं की ठीक आहे त्यांना पाठवा. तेव्हा मला त्या गार्डने सांगितलं की त्या महिलांना भेटायला पाठवणं योग्य नाही. मी गार्डला विचारलं की का? तर ते गार्ड बोलले की आम्हाला तशा सूचना आहेत. तेव्हा मलाही जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या सूचना होत्या की जर गार्डने सांगितलं की नाही जायचं तर नाहीच जायचं. त्यामुळे मी त्या महिलांना भेटलो नाही”, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.
“त्यानंतर २ तासांनी मला डीवायएसपींचा फोन आला. तेव्हा मला त्यांनी सांगितलं की पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी काही लोक आलेले आहेत आणि ते तुमच्या म्हणजे माझ्या विरोधात अॅट्रॉसिटी आणि विनयभंग अशी तक्रार करण्यासाठी काही महिला व वकील आले आहेत. तेव्हा मी विचारलं की तक्रार दाखल करण्याचं कारण काय? तेव्हा मला डीवायएसपींनी सांगितलं की सकाळी तुमचा सत्कार करण्यासाठी आलेल्या महिला तुमच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या आहेत. हे ऐकून मला धक्काच बसला”, असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं.
‘तेव्हा मला मोठा धक्का बसला’ : तुकाराम मुंढे
“मी तेव्हा प्रशिक्षणार्थी होतो, तेव्हा मला पोलिसांनी असंही साांगितलं की त्या महिलांना तुमचा सत्कार करायचा होता आणि त्याच दरम्यान स्वत:चे कपडे फाडून मग तुमच्या विरोधात तक्रार दाखल करायची होती. हे सगळं ऐकून तर मला आणखी मोठा धक्का बसला. तेव्हा मी स्वत:ला प्रश्न विचारला की असं का? माझं काय चुकलं? आपण योग्य आहोत की अयोग्य? आपण तर चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माझ्यासमोर दोन पर्याय होते. एक ज्या मार्गाने आपण चाललो आहोत, त्या मार्गाने पुढे जाणं आणि दुसरं म्हणजे मार्ग बदलणं. तेव्हा मी ठरवलं की आपण प्रशासकीय सेवेत कशासाठी आलो? नोकरी करायची एवढं ठीक आहे. पण आपला उद्देश काय? तेव्हापासून मी ठरवलं की आपण जो मार्ग निवडला, त्याच मार्गाने चालायचं आणि त्याच मार्गावर चालत आहे. माझ्या कुटुंबाने मला खूप साथ दिली, अन्यथा या मार्गावर चालणं खूप अवघड आहे”, असा धक्कादायक अनुभव तुकाराम मुंढे यांनी सांगितला.
तुम्ही कधी उद्विग्न झालात का?
तुम्ही कधी फार उद्विग्न झाला आहात का? आता खूप झालं, हे सहन होत नाही, त्यामुळे तुम्ही उद्विग्न झालात असं कधी घडलं का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, “हो, असं कमीत-कमी चार ते पाच वेळा झालं आहे. असे अनेक प्रसंग आयुष्यात आले आहेत. खरं तर असे प्रसंग कोणाच्याही आयुष्यात येऊ नयेत. आता मला ते प्रसंग या ठिकाणी बोलताही येणार नाहीत. अगदी कुटुंबाबरोबरही यावर चर्चा करता येत नाही, अशाही गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळे घरी आपली मुलं असतात, ते यावर काही प्रतिक्रिया देत नाहीत. पण ते सर्व पाहत असतात, ऐकत असतात. त्यामुळे मी एक प्रश्न स्वत:ला विचारत असतो आणि जबाबदारी घेत असतो. समजा मी आता महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचा आयुक्त आहे. मग त्या विभागाची जबाबदारी मी घेणार नाही तर कोण घेणार? असा प्रश्न मी स्वत: ला विचारत असतो”, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.
