‘अतिउत्साही’ आणि ‘हुकूमशाही’ वृत्तीने वागल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला (FDA) शनिवारी फटकारले होते. त्यानंतर पुणे येथील ‘सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लिमिटेड’च्या ‘कॅरी अँड फॉरवर्डिंग’ युनिटचा औषध विक्री परवाना रद्द करण्याचा आदेश एफडीएने मागे घेत असल्याचे न्यायालयाला सांगितले. एफडीएने या प्रकरणी ‘नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांविरुद्ध’ कृती केली असल्याचे ताशेरेही न्यायालयाने ओढले.
“तुम्ही स्वतःला देव समजता का?” अशा कडक शब्दांत न्यायालयाने एफडीएच्या अतिउत्साही कारवाईवर ताशेरे ओढले होते. याच पार्श्वभूमीवर आज आयोजित पत्रकार परिषदेत अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोर्टाच्या टिप्पणीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
पत्रकार परिषदेत जेव्हा पत्रकाराने न्यायालयाच्या ताशेऱ्यांचा उल्लेख करत “कारवाई करताना घाई होत आहे का? कोर्टाने तुम्ही देव आहात का असा प्रश्न विचारला, यावर तुम्हाला काय वाटते?” असा प्रश्न मुंढेंना विचारला, त्यावर मुंढे यांनी उत्तर दिले:
“मी देव नाही, मी तुकाराम मुंढे आहे आणि एक लोकसेवक म्हणून काम करत आहे. या बाबतीत माझ्या मनात कोणतीही शंका किंवा अस्पष्टता नाही,” असे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना त्यांनी प्रशासकीय भूमिकेचा पुनरुच्चार केला. “कारवाईदरम्यान काही त्रुटी किंवा चुका झाल्या असतील आणि न्यायालयाने त्या आमच्या निदर्शनास आणून दिल्या असतील, तर आम्ही नक्कीच त्यावर गांभीर्याने काम करू आणि सुधारणा करू,” असे आश्वासन त्यांनी दिले.
न्यायालयाच्या टीकेनंतर FSSAI चा पाठिंबा
FSSAI प्रमुखांनी दिलेला पाठिंबा तुकाराम मुंढे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएच्या या अति-कडक कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
“लहानसहान चुकांसाठी थेट व्यवसाय बंद करणे किंवा परवाने रद्द करणे म्हणजे डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करण्यासारखे आहे,” अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने एका सुनावणीदरम्यान केली होती. नियमांचे पालन करून व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारण्याऐवजी एफडीए घाईघाईने कठोर निर्णय घेत असल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला होता.
