अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त अन्नपदार्थ व अयोग्य औषधांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. PTI या प्रसारमाध्यमाशी बोलताना त्यांनी भेसळखोरांना थेट इशारा दिला असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तुकाराम मुंढे यांनी PTI शी संवाद साधला.
यादरम्यान पत्रकाराने त्यांना विचारले, “बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी तुमच्या कारवायांचे स्वागत केले आहे, तुमची स्तुती केली आहे. यासोबतच ‘तुमच्यामुळे आम्हाला चांगले अन्न खायला मिळत आहे, तुम्हाला कोणाची नजर लागू नये’ असेही वक्तव्य कलाकारांनी केले आहे. यावर काय सांगाल?”
‘नजर वाईट नाही, तर मुद्द्यावर हवी’
यावर उत्तर देताना तुकाराम मुंढे म्हणाले, “मला कुणाची नजर लागेल यावर माझा विश्वास नाही.” आपल्या धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे म्हणाले, “माझा कोणत्याही ‘दृष्ट लागण्यावर’ विश्वास नाही. आपली नजर नेहमी मूळ मुद्द्यावर आणि समस्येवर केंद्रित असायला हवी. सध्या मी भेसळयुक्त, असुरक्षित अन्नपदार्थ आणि बनावट औषधांच्या विक्रीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहे.”
देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या आजूबाजूला कोणताही गैरप्रकार घडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे सांगताना ते म्हणाले, “आपण स्वतःही चुकीच्या कामात सहभागी होता कामा नये. अन्न आणि औषधांचा थेट आपल्या आरोग्याशी संबंध असतो. त्यामुळे नागरिकांनीही आरोग्यास घातक असणारे, अस्वच्छ, अतिप्रमाणात चरबी (फॅट), साखर किंवा मिठाचे प्रमाण असलेले पदार्थ खाणे टाळावे.”
‘टीम तुकाराम मुंढे’ टी-शर्टची चर्चा आणि मुंढेंची प्रतिक्रिया
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्रीती झिंटा ‘Team Tukaram Mundhe’ असे लिहिलेला काळा टी-शर्ट परिधान करून सार्वजनिक ठिकाणी दिसली होती. यावर विचारले असता, “अशा खऱ्या हिरोंचा सन्मान करण्याची हीच योग्य वेळ आहे,” असे प्रीती झिंटा म्हणाली होती. यावर प्रतिक्रिया देताना मुंढे म्हणाले, “माझे प्रीती झिंटा यांच्याशी वैयक्तिकरीत्या किंवा फोनवर कोणतेही बोलणे झालेले नाही. मात्र, त्यांनी ‘टीम तुकाराम मुंढे’चा उल्लेख केला याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.”
हे केवळ माझे काम नाही, तर लोकचळवळ व्हावी!
आपल्या कामाच्या पद्धतीबद्दल बोलताना एफडीए आयुक्तांनी स्पष्ट केले की, ते आपले कर्तव्य पूर्ण निष्ठेने पार पाडत आहेत. “हे काम केवळ माझे एकट्याचे किंवा पदापुरते मर्यादित नाही. हा माझ्या संपूर्ण टीमचा आणि समाजाचा संयुक्त उत्तरदायित्वाचा भाग आहे. आमचे एफडीए पथक यासाठी रात्रंदिवस काम करत आहे. मात्र, भेसळमुक्तीचे हे ध्येय गाठण्यासाठी जनतेने यात हिरिरीने सहभागी झाले पाहिजे. या मोहिमेचे एका मोठ्या ‘लोकचळवळीत’ रूपांतर व्हावे, हीच माझी इच्छा आहे,” असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी शेवटी केले.
