Tukaram Mundhe FDA : अन्न व औषध प्रशासन विभागाकडून राज्यभरात मागील काही दिवसांपासून मोठ्या कारवायांचा धडाका सुरू आहे. तुकाराम मुंढे यांनी एफडीएच्या आयुक्तपदाची जबाबदारी हाती घेतल्यापासून भेसळखोरांविरोधात धडक मोहीम सुरू आहे. आतापर्यंत एफडीएकडून भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात अनेक मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात मोठी चर्चा सुरू आहे. त्यांच्या कामांचं अनेकांकडून कौतुक केलं जात आहे.
धडाकेबाज कारवाईमुळे कायम चर्चेत असलेले एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या चर्चा अधूनमधून सुरू असतात. यातच तुकाराम मुंढे यांच्यावर आता राज्य सरकारने आणखी एक जबाबदारी दिली आहे.
एमपीएससीच्या परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांचा तपास करण्यासाठी चौकशी आयोगाची स्थापना करण्यात आली आहे, एमपीएससी चौकशी आयोगाचे सचिव म्हणून तुकाराम मुंढे काम पाहणार आहेत. या संदर्भातील घोषणा मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रविवारी केली. मात्र, तुकाराम मुंढे यांच्याकडे सध्या असलेल्या एफडीए आयुक्तपदाच्या जबाबदारीचं काय? त्यांची बदली झाली आहे का? असे अनेक सवाल उपस्थित करण्यात येत होते. यावर आता खुद्द तुकाराम मुंढे यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. ‘माझी एफडीएमधून बदली झालेली नाही, मी एफडीएचा आयुक्त म्हणूनच कार्यरत आहे’, असं स्पष्टीकरण तुकाराम मुंढे यांनी दिलं आहे. या संदर्भात मुंढे यांनी एक्सवर (ट्विटर) सविस्तर पोस्ट शेअर केली आहे.
तुकाराम मुंढेंनी पोस्टमध्ये काय म्हटलं?
“माझी एफडीएमधून बदली झालेली नाही. मी अन्न व औषध प्रशासन विभागाचा (एफडीए) आयुक्त म्हणूनच कार्यरत आहे. असुरक्षित, निकृष्ट दर्जाचं व भेसळयुक्त अन्न आणि बनावट व निकृष्ट दर्जाची औषधे यांच्या विरोधातील आमचा लढा सुरूच राहणार आहे”, असं तुकाराम मुंढे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तुकाराम मुंढेंकडे MPSC पेपरफुटी चौकशी आयोगाची जबाबदारी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांचा तपास करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे. या आयोगाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांची नियुक्ती करण्यात आली, तर सचिवपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रविवारी केली. ‘एमपीएससी’चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिल्यानंतर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ही घोषणा केली होती.
