Tukaram Mundhe FDA Action on Chemically Ripened Bananas: अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढेंची नियुक्ती झाल्यापासून दररोज महाराष्ट्रात ठिकठिकाणी कारवाई केल्याच्या बातम्या समोर येत असतात. आजही अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईत आठ खाद्यगृहांचे परवाने निलंबित करण्यात आले. तर रासायनिक पद्धतीने पिकवलेल्या १,३९४ किलो केळीचा साठा जप्त करण्यात आला. तसेच प्रतिबंधित गुटखा आणि भेसळयुक्त दूधही जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने इंडिया टुडेला दिली.
अन्न व औषध प्रशासनाने नियम मोडल्याच्या कारणास्तव ११ आस्थापनांवर कारवाई केली. आठ खाद्यगृहांचे परवाने आणि इतर तीन खाद्यगृहांचे नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित करण्यात आली.
मुंबई विभागात ज्या ११ उपहारगृहांवर कारवाई झाली, त्यापैकी पाच पश्चिम उपनगरात आणि सहा दक्षिण मुंबईतील आहेत, अशी माहिती समोर येत आहे. याचबरोबर विले पार्लेमधील आरएन कुपर महानगरपालिकेच्या रुग्णालयातील कँटीनमध्ये अस्वच्छता, माश्या आणि झुरळे आढळून आली. तसेच कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगळे न ठेवल्याचे आढळले.
रासायनिक पद्धतीने पिकवल्याबद्दल गुन्हा
इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, एका फळविक्रेत्याने इथिफॉनच्या द्रावणात केळी बुडवत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्याविरोधात नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. इथिफॉन हे एक रसायन असून त्यामुळे वनस्पतींची वाढ होते, मात्र त्याचा वापर केल्यास धोकादायक रासायनिक अवशेष मागे राहतात. या कारवाईतून ६७,८१४ रुपये किमतीची १,३९४ किलो केळी जप्त करण्यात आली.

अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील तीन आस्थापनांमधून ३१.१४ लाख रुपये किमतीचे प्रतिबंधित खाद्यपदार्थ जप्त केले असून यासंबंधी तीन एफआयआर नोंदवले आहेत. तर पालघरमध्ये केलेल्या दोन कारवायांमध्ये प्रतिबंधित पान मसाला, गुटखा आणि सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आला.
पुणे विभागात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथे दुधात भेसळ केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावेळी ६.६९ लाख रुपये किमतीचे १६,७३० लिटर दूध नष्ट करण्यात आले.
