मुंबई : राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा सपाटा सुरूच ठेवला आहे. प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या अन्न पदार्थांवर व्यापक कारवाई सुरूच आहे. २५ मे ते ३२ मे या कालावधीत राज्यभरातील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल १ कोटी ५८ लाख २८ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, १०२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच ८६ आस्थापनांना टाळे लावले आहे.
प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्यावर मोठी कारवाई
अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याविरोधात विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान २७२ ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी १०३ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. कोकण विभागात सर्वाधिक ४६ जणांना अटक झाली, तर बृहन्मुंबईत २३, पुण्यात १३, छत्रपती संभाजीनगरमध्ये ८, नागपुरात २, नाशिकमध्ये ५ आणि अमरावतीत ५ जणांना अटक करण्यात आली. या कारवाईत ३४ लाख ५ हजार ४८ रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. अधिकाऱ्यांनी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे तसेच अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केली आहे.
भेसळयुक्त अन्नपदार्थांवरही कठोर कारवाई
सेफ फूड, सेफ ड्रग्ज महाराष्ट्र (Safe Food Safe Drug Safe Maharashtra) या संकल्पनेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त, अस्वच्छ व निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, जालना, बीड, नांदेड, परभणी, सोलापूर, नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, रायगड, धुळे आदी जिल्ह्यांमध्ये ७३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
या कारवाईत, आंबे, बुंदी लाडू, खवा, बेकरी पदार्थ, कँडी, दूध व दुग्धजन्य पदार्थ, गूळ, खाद्यतेल, तूप, खजूर, आईस्क्रीम/कुल्फी, फ्रोजन डेझर्ट, मसाल्याचे पदार्थ, रंगवलेले खाद्यपदार्थ आदी वस्तूंचा ९०,६३९ किलोंचा साठा जप्त करण्यात आला. या जप्त मालाची किंमत १ कोटी २४ लाख २३ हजार ६२९ रुपये इतकी आहे. संशयित नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट इशारा देताना सांगितले की, “जनतेच्या आरोग्याशी खेळ अजिबात खपवून घेतला जाणार नाही. प्रतिबंधित पदार्थांची विक्री किंवा भेसळयुक्त अन्नपदार्थांचे उत्पादन आढळल्यास संबंधितांवर यापुढे आणखी कठोर कारवाई करण्यात येईल.” राज्यातील अन्नसुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्य मजबूत करण्यासाठी अशा धडक मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
