Tukaram Mundhe FDA Action Mumbai Hotel Cleaning: अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हॉटेल्स आणि उपहारगृहांविरोधात सुरू केलेल्या धडक मोहिमेचा धसका मुंबईतील शहरातील हॉटेल व्यावसायिकांनी घेतला आहे. परवाना निलंबन आणि बदनामीच्या भीतीने मुंबईतील अनेक नामांकित हॉटेल्स, इराणी कॅफे आणि अगदी सरकारी उपाहारगृहांनीही आपले शटर तात्पुरते खाली खेचले असून दुरुस्ती, रंगकाम आणि संपूर्ण स्वच्छतेवर भर दिला आहे.

गेल्या काही दिवसांत ‘एफडीए’ने नियम धाब्यावर बसवणाऱ्या अनेक हॉटेल्सवर थेट धाडी टाकून त्यांचे परवाने निलंबित केले. इतकेच नाही तर किचनमधील अस्वच्छतेचे फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केले जात असल्याने हॉटेलचालकांचे धाबे दणाणले आहेत. या कठोर कारवाईच्या पार्श्वभूमीवर ‘इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन’च्या (आहार – AHAR) सदस्यांपैकी तब्बल ५० टक्के व्यावसायिकांनी हॉटेल्सचे नूतनीकरण सुरू केले आहे.

दिवसा व्यवसाय सुरू ठेवता यावा यासाठी अनेकजण रात्रीच्या वेळी दुरुस्तीची कामे उरकत आहेत, तर काहींनी काही दिवसांसाठी हॉटेल्स पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

आर्थिक नुकसानासह प्रतिष्ठेलाही धक्का

‘आहार’चे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी या कारवाईमुळे हॉटेलचालकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीवर चिंता व्यक्त केली. “मुंबईत आमच्या संघटनेचे सुमारे ८ हजार सदस्य असून यात प्रामुख्याने मध्यमवर्गीयासाठींचे छोटे हॉटेल आणि इतर हॉटेल्सचा समावेश आहे. अनेक उपहारगृहे ही तिसऱ्या पिढीतील व्यावसायिक चालवत असून त्यांनी अनेक दशकांच्या मेहनतीने ही प्रतिष्ठा कमावली आहे. एफडीए केवळ कारवाईच करत नाही, तर त्यांची नावे उघड करून बदनामी करत आहे. अगदी छोट्या त्रुटींसाठीही परवाना निलंबित केला जात असल्याने व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून ते मानसिक तणावाखाली आहेत”, असे विजय शेट्टी म्हणाले.

fda-action-mumbai-hotel-cleaning-renovation
एफडीएच्या धास्तीच्या भीतीने मोठ मोठ्या हॉटेल्सनी आता किचनच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले आहे.

कारवाईपासून वाचण्यासाठी अनेक हॉटेलचालक आता खासगी अन्नसुरक्षा परीक्षकांची मदत घेत आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना ‘फोस्टॅक’ अंतर्गत अन्नसुरक्षेचे विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. ‘हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (वेस्टर्न इंडिया)’नेही अलीकडेच ४ हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र दिले आहे.

सरकारी कँटीनही दुरुस्तीच्या नावाखाली बंद

कारवाईची ही धास्ती केवळ खासगी हॉटेल्सपुरती मर्यादित नसून शासकीय कार्यालयांमधील कँटीनमध्येही हाच प्रकार पाहायला मिळत आहे. ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएमआरडीए कार्यालयात तपासणीसाठी पथक पोहोचण्यापूर्वीच दुरुस्तीचे कारण देत कँटीन बंद ठेवण्यात आले होते.

बीकेसीमधील जिल्हाधिकारी कार्यालय आणि कलिना विद्यापीठातील उपाहारगृहेदेखील बंद असल्याचे सांगण्यात आले.

tukaram-mundhe-fda-crackdown-mumbai-hotels-close
शासनाच्या कार्यालतील उपहारगृहेही स्वच्छतेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात येत आहेत.

नामांकित हॉटेल्समध्ये नुतनीकरण

दक्षिण मुंबईतील नामांकित खाद्यपदार्थ केंद्रांवरही याचा परिणाम स्पष्टपणे दिसत आहे. फोर्ट परिसरातील एका केरळी उपहारगृहात पूर्वी दिवसातून दोनदा होणारी स्वच्छता आता तीनदा केली जात असून प्रत्येक वेळी ४५ मिनिटांसाठी ‘डीप क्लिनिंग’ केले जात आहे.

काळा घोडा परिसरातील प्रसिद्ध ‘अयुब्स’ हे रोल सेंटर केवळ फरशांची दुरुस्ती आणि रंगकामासाठी सलग चार दिवस बंद ठेवण्यात आले होते. २०२० च्या टाळेबंदीचा अपवाद वगळता पहिल्यांदाच हे उपहारगृह दुरुस्तीसाठी बंद राहिल्याचे दिसले.

शतकभर जुने असलेले काळबादेवी येथील प्रसिद्ध ‘श्री ठाकर भोजनालय’नेही दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी काही दिवसांचा ब्रेक घेतला आहे. ‘के. रुस्तम’ या आईस्क्रीम पार्लरवर कारवाई झाल्यानंतर ठाकर भोजनालयावरही कारवाई झाल्याची अफवा पसरली होती. मात्र भोजनालय व्यवस्थापनाने समाजमाध्यमांवर स्पष्टीकरण देत, ही केवळ नियोजित किचन सुधारणा असल्याचे स्पष्ट केले.

Tukaram Mundhe Making Tea Viral Video
अन्न भेसळीविरोधात धडक कारवाई करणारे तुकाराम मुंढे मित्रांसाठी स्वतः चहा बनवताना दिसले

‘एफडीए’ची भूमिका ठाम

या घडामोडींवर अन्न व औषध प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, “अखेर हॉटेल्सना स्वच्छतेचे महत्त्व पटू लागले ही चांगली बाब आहे. अनेक हॉटेल्स त्यांच्या आतील वातावरणाचा आणि चवीचा मोठा गाजावाजा करतात; परंतु प्रत्यक्ष अन्न शिजवले जाते त्या स्वयंपाकघरातील अस्वच्छतेकडे ग्राहकांचे लक्ष नसते. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड केली जाणार नाही आणि ही मोहीम अशीच सुरू राहील.”